Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फूटीनंतर आज शिवसेनेचा (Shivsena) आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने शिंदे गट आणि भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राला मोडून, कमजोर करून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल? असा शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केला आहे.  


आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होणार असून कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. विरोधकांना मात देऊन पुन्हा मुंबई जिंकूच असा आत्मविश्वासही अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? असा सवाल करत शिवसेनेने शिंदे गटाला टोला लगावला आहे. 


फूट पाडण्यासाठी आजच दिवस


दसरा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. मात्र, महाराष्ट्र, मराठी एकजुटीत फूट पाडण्यासाठी काही नतद्रष्टांची आजची निवड केली असून हिंदुत्वाची वज्रमूठ असलेली शिवसेना कमजोर करण्यासाठी काही लोकांनी आजचा मुहूर्त निवडला असला तरी शिवसेना ही काही लेचापेचांची संघटना नाही असे शिवसेनेने विरोधकांना ठणकावले आहे. विजयादशमीच्या दिवशी सर्व अमंगल गोष्टींचा, कपट-कारस्थानांचा नाश होतो म्हणून विजयादशमीला आपल्या हिंदू संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. यंदाचा दसराही अशा रावणांचा, महिषासुरांचा नाश करणार आहे. रावण मारला गेला तो आजच्याच दिवशी. रावणाने स्वतःलाच देव समजण्याची मोठी चूक केली होती. त्या अहंकाराने त्याचा बळी घेतला. महाराष्ट्रात व देशात सध्या अशा अहंकाराच्या वावटळी निर्माण झाल्या असल्याचे सूचक वक्तव्य अग्रलेखात करण्यात आले आहे. बहुमतातले सरकार पैसा आणि धमक्या देऊन पाडणे हे पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यासारखेच सोपे आहे असे काही लोकांना वाटत आहे, पण महाराष्ट्रातले नवे सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झाले असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. 


भाजपवर हल्लाबोल


शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भ राज्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही शिवसेनेने टीका केली आहे. महाराष्ट्रातले नवे सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झाले आहे. ‘योग्य वेळ येताच विदर्भ हे स्वतंत्र राज्य करू, असे बावनकुळे यांनी विधान करणे म्हणजे देशात इतर नवी राज्ये निर्माण होतील, तेव्हा विदर्भाचा लचका तोडू असेच मनसुबे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आहेत व त्यावर सत्तेतला ‘मिंधे’ गट गप्प बसला आहे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. 


महाराष्ट्र तोडण्याचा कट


महाराष्ट्राची अखंडता, मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातून मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे माहीत असल्यानेच एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना वेगाने घडत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. महाराष्ट्रातील उद्योग खेचून-पळवून गुजरातेत नेले जात आहेत. एक ‘वेदांता’च नाही, तर ‘ड्रग्ज पार्क’पासून अनेक प्रकल्प उद्योगपतींना फूस लावून, आमिषे दाखवून न्यायचे हे कसले लक्षण मानावे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 


पंतप्रधानांचे वक्तव्य दुर्देवी


गुजरातला बदनाम करण्याचे व या राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक रोखण्याचे कारस्थान काही जणांनी रचल्याचे विधान आमच्या पंतप्रधानांनी करावे हे दुर्दैवच म्हणायला हवे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, ते गुजरातइतकेच महाराष्ट्राचे आहेत हे तत्त्व आम्ही तरी पाळतो, असेही शिवसेनेने म्हटले.


पीएफआयपेक्षा तपास यंत्रणांचा दहशतवाद मोठा


शिवसेनेने ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला. संपूर्ण देशाचे वातावरण एका दबावाखाली, तणावाखाली आहे. ‘पीएफआय’सारख्या दहशतवादी विचारांच्या संघटनांचा बीमोड केला जात आहे, हे चांगलेच आहे. अशा प्रकारची विषवल्ली उपटून नष्टच केली पाहिजे. अशा कारवाया राष्ट्रहितासाठी आवश्यक ठरतात, पण कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद ‘जैसे थे’ आहे. तेथील कश्मिरी पंडितांचा आक्रोश दिल्लीला अस्वस्थ करू शकलेला नाही याचे दुःख असल्याचे शिवसेनेने म्हटले. 


‘पीएफआय’पेक्षा भयंकर दहशतवाद ‘ईडी-सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी चालवला आहे. राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी या संस्था बेकायदेशीरपणे वापरल्या जातात तेव्हा देशात कायद्याचे राज्य आहे असे अजिबात म्हणता येत नाही. राजकीय विरोधक भयग्रस्त असणे हे लोकशाहीचे लक्षण नसल्याचे त्यांनी सांगितले. 


रुपयाची किंमत मातीस मिळाली, महागाई वाढली, बेरोजगारी वाढतच आहे, शेतकरी आत्महत्या करतोच आहे व त्यावर उपाय काय, तर यापुढे ‘हॅलो’ म्हणायचे नाही, तर ‘वंदे मातरम्’ म्हणा! ही मातृभूमी आमचीच आहे. त्या मातृभूमीपुढे आम्ही सदैव नतमस्तक आहोत, पण ही भूमी खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् कधी होणार? चीन फक्त लडाखच्या सीमेवर नाही, तर अरुणाचलातही घुसला आहे. त्यांना धडा कधी शिकविणार? असा सवाल शिवसेनेने केला आहे.