Andheri East Bypoll Elections 2022 : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक (Andheri Bypoll Elections) जाहीर झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचं 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. 


सध्या शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीमुळे राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तसेच, राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहे. याचाच प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. अशातच शिवसेनेत दोन गट झाल्यामुळे ही निवडणुक कशी होणार? ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (CM Eknath Shinde) कोणत्या निवडणूक चिन्हाचा वापर करणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 


पाहा व्हिडीओ : अंधेरी पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला मतदान, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी



पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाची जागा भाजपकडे


आमदार रमेश लटके (Ramesh Latke News) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे गट (Shinde Group) असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपनं आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गटानं इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपनं आपल्याकडे घेतल्यानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.






अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात आशिष शेलार यांनीही एक ट्वीट केलं होतं. ते म्हणाले आहेत की, "अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज करण्यात आले. भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार श्री. मुरजीभाई पटेल यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा असल्याचं यावेळी दिसलं." यामध्ये ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी मुरजी पटेल यांचा उल्लेख भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार असा केला आहे. 


2019 मधील निवडणुकीचा निकाल 


रमेश लटके यांना 42 टक्के मतं मिळाली होती. (भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार)
मुरजी पटेल यांना 31 टक्के मतं मिळाली होती.  (अपक्ष उमेदवार)


निवडणूक जाहीर, चिन्हाबाबत सस्पेन्स कायम 


शिवसेनेचे प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर होणारी ही पहिली पोटनिवडणूक आहे. रमेश लटके यांचं मे महिन्यात निधन झालं होतं. नियमानुसार, सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणं गरजेचं आहे. या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? पक्षाच्या चिन्हाबाबतची लढाई अद्याप निवडणूक आयोगात सुरु देखील झालेली नाही. केवळ एका बाजूची कागदपत्रं दाखल झाली आहेत. अशावेळी हे चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं? याचा निर्णय आयोग कसा घेणार, हे पाहावं लागले. कारण सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत निर्णयाचे अधिकार तर दिले आहेत. पण अद्याप आयोगात केवळ शिंदे गटाचीच कागदपत्रं सादर झालेली आहेत. ही कागदपत्रं आम्हाला मिळावीत, त्यानंतर आम्ही आमची कागदपत्रं सादर करु, ही भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. सहसा निवडणूक तोंडावर आली असेल तर आयोग वादात असलेलं चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असतं. या प्रकरणात ते होतं की, केस आयोगासमोर सुरु झालेली नाही, त्यामुळे आमचं चिन्ह आम्हाला राहिलं पाहिजे हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दावा आयोगात योग्य ठरतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने रमेश लटके यांचं निधन


मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके बुधवारी 11 मे 2022 संध्याकाळी दुबईत हृदयविकाराने निधन झालं होतं. ते दुबईला आपल्या कुटुंबासह फिरायला गेले होते. परंतु तिथेच हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं होतं. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 21 एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. ते मूळचे ​कोल्हापुरातील शाहूवाडीचे होते. 52 वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती.