Maharashtra Political Crisis : राज्य विधानसभेत आज एकनाथ शिंदे सरकारनं बहुमताची परीक्षा पास केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी शहाजी पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसात अनेकांना खूप काही बघायला मिळालं. सूरतला जायला मिळालं, तिथून गुवाहाटीला जायला मिळालं तिथून गोव्याला गेले. दहा दिवसात आमदारांना हयातीत इतकं फिरायला मिळालं नसेल, असं पवार म्हणाले. यावेळी शहाजी पाटील यांचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले की, शहाजी बापू म्हणतात काय झाडी काय डोंगार काय हाटेल, ओक्के ओक्के. बापू आपण 95 ला एकत्र निवडून आलो. यात फार गोंधळून जायचं कारण नाही. ही मोठी लोकं एकत्र कधी येतील कळणारही नाही. तुम्ही मागे राहाल. बाकीचे म्हणतील आम्ही कधी तसं म्हटलं नव्हतो, असं अजित पवार म्हणाले.


सूरतला जाण्याआधी आमच्यासोबत अब्दुल सत्तार दोन तास गप्पा मारत बसले होते


अजित पवार म्हणाले की, शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यावर कारण काही आमदारांनी टेबलावर जाऊन डान्स केला. सत्ता येत असते सत्ता जात असते. सगळे लोकं पाहात असतात. प्रवक्ता म्हणून केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार आहेत, असं ते म्हणाले. अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळाचं स्थिरस्थावर होत नाहीत तोवर काही जण गप्प आहेत. त्यातले अब्दुल सत्तार एक आहेत. सूरतला जाण्याआधी आमच्यासोबत अब्दुल सत्तार दोन तास गप्पा मारत बसले होते आणि लगेच सूरतला गेले, असं पवार यांनी म्हणताच एकच हशा पिकला. 


आज देवेंद्रजींना भाषण करताना पाहिलं पण उत्साह नव्हता


अजित पवार म्हणाले की, आज देवेंद्रजींना भाषण करताना पाहिलं पण उत्साह नव्हता. विधिमंडळात निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्वात नशीबवान देवेंद्र फडणवीस. अडीच वर्षात ते मुख्यमंत्रीही झाले, उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्षनेतेही झाले. एकही महत्वाचं पद त्यांनी सोडलं नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी टोलेबाजी केली. 


शिंदे जर सर्वगुणसंपन्न होते तर रस्तेविकास महामंडळाचं खातं का दिलं?


अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत हे सतत का सांगावं लागतं, याचं आत्मपरीक्षण व्हायला हवं. सत्ता येते सत्ता जाते, ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलं नाही. फडणवीसजी तुम्ही इतकं शिंदे यांचं कौतुक करत होते मग तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना रस्ते विकासचं खातं का दिलं, त्यांना महत्वाचं खातं का दिलं नाही. शिंदे जर सर्वगुणसंपन्न होते तर रस्तेविकास महामंडळाचं खातं का दिलं, जनतेची संबंधित खातं का दिलं नाही. महाराष्ट्रही याबाबत विचार करेल. नेता मोठा असेल तर खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील यांना ते माहिती आहे, असं ते म्हणाले. 


ठराव इतका घाईत आणण्याची गरज नव्हती


अजित पवार म्हणाले की, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत त्याआधी तुम्ही बहुमताची चाचणी घेतली. ठराव इतका घाईत आणण्याची गरज नव्हती असं तज्ञ म्हणतात. काही गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम राज्यपाल महोदयांनी केलं आहे. आता एकदम तडफेनं काम चाललंय. राज्यपाल महोदय अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांकडे अध्यक्ष निवडीसाठी गेलो मात्र ती झाली नाही. आता चार दिवसात किती वेगानं घटना घडला. महाराष्ट्रातील जनता याचा विचार करत आहे, असं अजित पवारांनी म्हटलं. 


इतर महत्वाच्या बातम्या


बहुमत प्रस्तावाच्या विरोधात 'मविआ'ला शंभरीही गाठता आली नाही; अशोक चव्हाणांसह 'हे' सदस्य गैरहजर


Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला


Devendra Fadnavis : ज्यांनी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार, फडणवीसांचा हल्लाबोल