Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली. तर या प्रस्तावाच्या विरोधात 99 मतं पडली. काल विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाच्या विरोधात 107 मतं पडली होती. आज बहुमत चाचणीच्या वेळी शंभरीही गाठता आली नाही. या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आजच्या प्रस्तावाच्या वेळी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे तीन आमदार तटस्थ राहिले


काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज मोठी परीक्षा होती. मात्र काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सहज जिंकल्यानंतर तशी ही लढाई सोपी झाली होती. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांच्या बहुमताच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली. 


त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली होती. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. आज या गटाला संतोष बांगर हे आमदार देखील येऊन मिळाले. काल संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केले होते. आज बांगर यांनी शिंदे यांच्या बाजूने मतदान केले.


30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना आज बहुमत चाचणीला सामोरं जावं लागलं. दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. नार्वेकर यांना 164 मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधातील राजन साळवी यांना 107 मतं मिळाली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Politics Shivsena : पुन्हा कोर्टात धाव! शिवसेनेतली गटनेतेपदाची लढाई सुप्रीम कोर्टात


'मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील, ही तात्पुरती व्यवस्था'; संजय राऊतांचा दावा


Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारसाठी आज कसोटीचा दिवस; बहुमत चाचणी होणार, काय असेल रणनीती?