मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. एनसीबीने तपास सुरु केल्यानंतर या क्षेत्रातील अनेक मोठी नावे समोर आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने बॉलिवूडमधील आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनच्या तपासाची मागणी केली आहे. या संदर्भात एनसीबीला तक्रार केली आहे. मात्र, एनसीबीने तपास केला नाही तर चार ते पाच दिवसात महाराष्ट्र पोलीस तपास सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
भाजप नेत्यांच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन तक्रार केली. यापूर्वी सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एनसीबीकडे पाठवली होती. मात्र, एनसीबी याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत, जर एनसीबीने तपास केला नाही तर पोलीस याचा तपास करतील, असे देशमुख म्हणाले.
अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; 2 कोटी 40 लाख रुपयांचे ड्रग्ज मुंबईच्या धारावी येथून जप्त
ड्रग्ज कनेक्शनमधील संदीप सिंहचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध. तसंच भाजपचे मागील निवडणुकीतील स्टार प्रचारक विवेक ऑबेरॉय यांचा ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्याची सचिन सावंत यांची मागणी आहे. विवेक ऑबेरॉय हे नरेंद्र मोदी बायोपिकचे निर्माते आणि कलाकार आहेत. बंगळुरु पोलीस मुंबईत येऊन विवेक ऑबेरॉयची चौकशी करतात, मग एनसीबी तपास का करत नाही? असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
आता कुणाचीही चौकशी नाही, पुराव्यांचे करणार पुनरावलोकन
सध्या कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला चौकशीसाठी बोलावण्यात येणार नाही. आतापर्यंत जो तपास करण्यात आला, तसेच ज्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्याचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. एनसीबी तपासातील रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी मुंबईत आलेले एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना दिल्लीला परतले आहेत. राकेश अस्थाना यांनी आतापर्यंतच्या एनसीबीच्या तपाससंदर्भात सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनची पडताळणी करत असलेल्या दिल्ली-मुंबई एनसीबीच्या टीमकडून रिपोर्ट घेण्यासाठी स्वतः एनसीबी डीजी राकेश अस्थाना दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते.
NCB Raid | एनसीबीचे देशभरात छापे; मुंबई, पालघर, जम्मू-काश्मीरमधून कोट्यवधीचं ड्रग्ज जप्त