मुंबई : मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. त्यातच आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारात 2 कोटी 40 लाख रुपये किंमत असणारे 1 किलो 200 ग्रॅम ड्रग्ज जप्त केलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही मोठी कारवाई केली असून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.


अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला 14 तारखेला मिळालेल्या माहितीनुसार धारावी परिसरातल्या 90 फिट रोड परिसरात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याचे कळलं होतं. त्यानुसार घाटकोपर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिटने सापळा रचला आणि संशयित व्यक्तीला बेड्या ठोकल्या. त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याच्याकडून हेरॉईन ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल 2 कोटी 40 लाख रुपये आहे.


मुंबईत ड्रग्जविरोधात होणाऱ्या कारवाया पाहता आरोपीकडून जप्त करण्यात येणारं ड्रग्ज मुंबईत नक्की कोणत्या मार्गाने येतं हा प्रश्न नेहमी निर्माण होतो. हेरॉईन, कोकेन, मेफीड्रिन, यासारख्या असंख्य प्रकारच्या ड्रग्जची मुंबईत तस्करी केली जाते. या ड्रग्जची मागणी करणाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एनसीबीने ड्रग्ज अँगलने तपास केला. यामध्ये अनेक हायप्रोफाईल व्यक्तिसुद्धा ड्रग्जचं सेवन करत असल्याची माहिती समोर आली. मुंबई ड्रग्ज तस्करीचे हब बनत आहे का? असा प्रश्न आता विचारला जातोय.


चार्ल्स शोभराज बनण्याचं स्वप्न भंगले... गुन्ह्यांच्या अर्धशतकाजवळ पोहोचलेल्या गुन्हेगाराला विलेपार्ले पोलिसांकडून अटक


गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या मोठ्या कारवाया ड्रग्ज आणि त्याचा व्यवसाय करणाऱ्यांन विरोधात दिसून येत आहे, ज्या मधील ही हल्लीच्या दिवसांमधील सगळ्यात मोठी कारवाई आहे. इतकं मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने तपास यंत्रणा अधिक सज्ज झाल्या आहेत. तसेच या सापडलेल्या साठ्यामागे कोण आहे? याचा तपास सुरू केला आहे.


घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या या आरोपीचे नाव मनझार दिन मोहमद शेख (वय 47) असं आहे. यापूर्वीसुद्धा 2018 साली त्याच्यावर घाटकोपर युनिटनेच ड्रग्जविरोधात कारवाई केली होती. आरोपी शेख हा मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री करत असल्याचं समोर आलंय. हेरॉईन ड्रग्ज महाग असल्यामुळे हे ड्रग्ज विकत घेणारे नक्की कोण आहेत? याचाही शोध पोलीस घेणार आहेत.


सदरची कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक घाटकोपर युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक सशांक शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस हवालदार पाटील, जाधव, वाघ पोलीस शिपाई चौरे, शेगावकर, खांगळ,जांभळे या पथकाद्वारे करण्यात आली आहे.


धारावीतून 2 कोटी 40 लाखांचं ड्रग्ज जप्त, नार्कोटिक्सची मोठी कारवाई