मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका इमारतीच्या 23व्या मजल्यावर स्टंट करणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या तरूणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या तरूणाचा स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचं समोर आलं होतं. मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली होती.


मुंबई पोलिसांनी तपास सुरु करताच हा व्हिडीओ कांदिवलीतील एका तरूणाने शूट केल्याचं निष्पन्न झालं होतं. कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर या तरूणाची ओळख पटली असून याचं नाव नोमाण डिसूजा आहे. गुरूवारी रात्री पोलिसांनी या तरूणाला अटक केली. हा तरूण सध्या शिकत असून त्याला स्टंट करण्याची आवड आहे. तसेच आपल्या मित्रांसोबत हा तरूण जीवघेणे स्टंट करत असतो, असी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. तसेच या तरूणाच्या इतरही मित्रांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.


पाहा व्हिडीओ : मुंबईत 23व्या मजल्यावर स्टंट करणाऱ्या कांदिवलीच्या तरूणाला बेड्या



दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली होती. कांदिवलीचे पोलीस निरिक्षक रवी अडाने यांनी सांगितलं होतं की, हा व्हिडीओ कांदिवली पश्चिम भागात असणाऱ्या भारत बिल्डिंगमधील 23व्या मजल्यावर शूट करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणीपोल चौकशी केल्यानंतर ज्या मजल्यावरील घरात हा व्हिडीओ शूट केला गेला. त्यासंदर्भात माहिती मिळाली होती.


बऱ्याचदा सोशल मीडियावर तत्काळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सेल्फी किंवा व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात दरवर्षी कोट्यवधी लोक मृत्यूमुखी पडतात. तसेत इंटरनेटवर अनेक सोशल मीडिया चॅलेंजेसही व्हायरल होत असतात. ज्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकदा या प्रसिद्धिसाठीच अनेक जीवघेणे स्टंट करण्याचा तरूण प्रयत्न करत असतात. परंतु, असं करणं जीवावरही बेतू शकतं.