मुंबई :  एकीकडे ओमायक्रॉनचं संकट गडद होत असताना, लहान मुलांचं लसीकरण कधी सुरु होणार असा प्रश्न प्रत्येक पालकाल पडलाय. मुंबई पुरतं बोलायचं झालं तर केंद्राकडून मंजुरी मिळताच आठवडाभरात लसीकरण सुरु करण्याचं नियोजन मुंबई महापालिकेनं आखलं आहे. 


पहिल्या दिवशी, 28 व्या दिवशी आणि 56 व्या दिवशी... अशा प्रकारे लहान मुलांना तीन डोस देण्यात येणार आहेत. 2 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी 250 केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार आहे. डोसची उपलब्धता आणि मुलांकडून मिळणारा प्रतिसाद यानुसार केंद्रांची आणि लसीकरणाची संख्या वाढवली जाणार आहे. 18 वर्षांखालील 35 लाख मुलांचे लसीकरण करण्याचं आव्हान मुंबई महापालिकेसमोर असणार आहे. 


लस दिल्यानंतर रिअॅक्शन खबरदारीसाठी बालरोग वॉर्डाचा वापर करण्यात येणार आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पालिका व्यापक प्रमाणात जनजागृती करणार आहे. तसेच  लशींचा साठा करण्यासाठी पालिकेकडे कांजूरमार्गसह इतर ठिकाणी शीतगृह व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांना लसी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण तातडीने देण्यात येणार आहे.


मुंबईत पुन्हा कोरोना फोफावतोय?


मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मुंबईत 602 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी 490 रुग्णांची नोंद झाली होती. 21 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी मुंबईत 327 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तीन दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोना फोफावतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



महत्त्वाच्या बातम्या :