मंबई : अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्माता दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar Party) आयोजित केलेली पार्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील मंत्री उपस्थित होते. असा आरोप भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता. आज आशिष शेलार यांच्या या आरोपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आव्हान दिले आहे. "खोटे आरोप करू नका, त्या पार्टीत जे मंत्री सहभागी झाले होते. ते सिद्ध करा, नाहीतर जनतेची माफी मागा" असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना दिले आहे. 


करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासह इतर आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीवरून बरेच वाद निर्माण झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही गंभीर आरोप केले होते. या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील ( Maharashtra Government) एक मंत्री सहभागी झाले होते असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपाला BMC महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आव्हान दिले आहे. पेडणेकर यांनी यावेळी शेलार यांच्यावर कडाडून टीकाही केली. 


"आम्ही शिवसेनेच्या रणरागीणी आहोत. खोटे आणि बेछुट आरोप आम्ही खपवून घेणार नाही. माझ्यावर सिंतोडे उडवले, त्याला मी बघेनच. तुमच्या आरोपांनी आणि पत्रांनी घाबरून जाणार नाही. मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असून खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली जात आहे. परंतु, जनतेलासुद्धा आता तुमचा खोटारडेपणा समजला आहे. करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत नक्की कोण मंत्री होते? याचा उलगडा करा, नाहीतर जनतेची माफी मागा," असे आव्हानच किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना केले आहे. 


पेडणेकर म्हणाल्या. "कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निष्काळजीपणा करून चालणार नाही. करण जोरहच्या पार्टीत सहभागी सेलेब्रिटींवर पालिकेने योग्य कारवाई केली आहे. परंतु, शेलार यांनी त्या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील एक मंत्रीही उपस्थित होते असा अरोप केला होता. लोकशाहीने अधिकार दिले आहेत. त्याचा अपमान करू नका. आशिष शेलार आणि भाजपचे नेते खोटे बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. खोटं बोल पण रेटून बोल, अशी वृत्ती वाढत आहे." अशी टीका पेडणेकर यांनी यावेळी केली. 


'शेलार आमदार झाले पण जीव अजून महापालिकेत घुटमळतोय', महापौरांचा टोला
 "आशिष शेलार आमदार झाले, त्यानंतर मंत्री  झाले. परंतु, त्यांचा जीव अजूनही माहपालिकेत घुटमळत आहे. असं असेल तर त्या जीवाला आता मोकळं करा." असा टोला किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना लगावला. 


 जगात मुंबई महापालिकेचे कौतुक
"कोरोनाविरोधात केलेल्या कामामुळे जगभरात मुंबई महापालिकेचे कौतुक होत आहे. परंतु, भाजप केवळ खोट बोलून रेटून आरोप करत आहेत. लोकांना भाजपच्या कामाची किंमत समजली आहे. भाजपमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा लागली आहे. आशिष शेलार पुढे, भातखलकर पुढे की अमित साटम पुढे. शेलार यांच्या वागण्याला भाजपचे नगरसेवक वैतागले आहेत. अनेक नागरसेविकांची नाराजी आहे. त्यामुळे शेलारांनी बोल घेवडे पोपट बंद केले पाहिजेत." असा टोला पेडणेकर यांनी यावेळी लगावला. 
 
दूध टाकणाऱ्यांचे सरकार स्थापण करायला निघाले होते
"अमित शहा सत्तेबाबत बोलत आहेत. मग पहाटे दूध टाकायच्यावेळी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्यावर का बोलत नाहीत? अमित शाह यांना स्थानिक भाजप नेत्यांवर विश्वास नाही. त्यामुळेच ते जनतेला लुभावण्यासाठी येतात. दूध येण्याच्या वेळेला शपथ का झाली? याचा खुलासा भाजपने करावा. जी संधी सरकार स्थापनेची घेतली त्याबाबत जनतेला सांगावे. पहाटे दूध घरात येण्यापूर्वी अगोदर दूधवाला बनून तुम्ही शपथविधी घेतलात आणि आता आम्ही एकत्र आहोत तर मग का पोटात दुखते ? तेव्हा कोण कुणाच्या गोदीत बसले होते? तेव्हा अजित पवारांना खांद्यावर घेवून नाचलात मग आता काय होत आहे? अजित पवार सोबत आले त्यावेळी वाहवा करणारी भाजप आता त्यांच्यावर आरोप करत आहे. अशी टीका पेडणेकर यांनी केली. 


महत्वाच्या बातम्या