मुंबई  :  मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेत विकासकामांच्या कंत्राटांची कोटींची उड्डाणं होत आहेत. नुकतेच मुंबई महापालिकेत 1700 कोटींच्या रस्ते कामांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. खरं तर मुंबईत  रस्त्यांची कामे ही पावसाळ्यानंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये सुरू होणे अपेक्षित असते. मात्र यंदा रस्ते कामांना अखेरीस डिसेंबरमध्ये मुहूर्त मिळाला आहे. 


गेल्या 21 वर्षात मुंबईतल्या रस्त्यांवर महापालिकेनं तब्बल 25 हजार कोटी खर्च केले. दरवर्षी मुंबईच्या रस्त्यांची ही श्रीमंती वाढत आहे. यंदाच्या वर्षी यामध्ये 1786 कोटींची भर पडली आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक वेळेला रस्ते, उद्यानांच्या दुरुस्तीचे हजारो कोटी रुपयांचे प्रस्ताव मांडण्यात येतात. यंदा 1786 कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर झालेत. मुंबईतील विविध भागात सिमेंट कॉंक्रिटसह डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हा खर्च करण्यात येणार आहे.


मुंबई पालिकेने एप्रिलमध्येच रस्ते दुरुस्तीसाठी  निविदा मागवल्या होत्या. मात्र, त्यावेळी अंदाजित खर्चापेक्षा 30 टक्क्यांनी कमी दराच्या असल्याने फेरनिविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा आलेल्या निविदा या देखील या निविदा उणे 13 ते 27 टक्के दरानं मंजूर झाल्या. त्यामुळे, विरोधकांनी  या रस्त्यांच्या दर्जाविषयी शंका व्यक्त केली आहे. 


 याआधी महापालिकेतला रस्ते घोटाळा चांगलाच गाजला होता. या घोटाळ्याचा अहवाल अजूनही सादर झालेला नाही. या कामांसाठी नेमल्या जाणाऱ्या कंत्राटदाराची क्षमता आणि त्यांच्या कामाचा दर्जा काय, याची माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्यामुळे, रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखण्यासाठी या प्रस्तावात थर्ड पार्टी ऑडिटरची  नेमणूक करण्याची तरतुदही करण्यात आली आहे.