Maharashtra Mumbai Covid-19 News : एकीकडे देशात कोरोनाची चौथी लाट (Coronavirus 4th wave) जूनमध्ये धडकणार असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तर, दुसरीकडे देशात सध्या सर्व कोविड (Covid-19) नियम मागे घेण्यात आले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत मंगळवारी 1 हजार 118 रुग्णांची नोंद झाली आहे. अशातच दिल्लीपाठोपाठ आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी, रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. 


10 दिवसांत मुंबईत 35 टक्के रुग्णांची वाढ 


मंगळवारी मुंबईत 122 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


मुंबईत महिन्याच्या सुरुवातीला शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 628 इतकी होती. मंगळवारी ही रुग्णसंख्या वाढून 844 वर पोहोचली आहे. तसं पाहायला गेलं तर, शहरात गेल्या 8 दिवसांत दररोज सरासरी 100 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. परंतु, रुग्णालयांमध्ये केवळ एक, दोन रुग्ण दाखल होत असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईत सध्या 25,249 बेड्सपैकी केवळ 25 बेड्सवरच कोरोना रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


राज्यात मंगळवारी 223 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


महाराष्ट्रात मंगळवारी 223 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 161 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात काल (मंगळवारी) दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,370 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण 8,04,22,318 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.