डोंबिवली : डोंबिवली संदप गावातील खदानीत पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या भागातील पाणी टंचाईची भीषणता समोर आली आहे. यानंतर या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे याना भावनिक पत्र पाठवलं आहे. "या भागातील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी, कचरा आणि इतर समस्या मांडण्याचा आपण अनेकदा प्रयत्न केला, मात्र यात नेहमीच राजकारण आडवे आले असून या दुर्दैवी घटनेनंतर तरी  राजकारण बाजूला ठेवून 'मृत्यूकारण' तपासून पाहूया," असे सांगत पालकमंत्री म्हणून संबधित अधिकाऱ्याबरोबर तातडीची बैठक घेत तातडीने निर्णय घ्या आणि या गरिबांना न्याय द्या अशी विनवणी आमदार पाटील मंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.






 



तुम्ही सध्या वाहिन्यांवर दिसता पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने. तुम्हाला कदाचित ही दुर्दैवी घटना माहित नसेल म्हणून हा पत्रप्रपंच करत असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केलं आहे. पाण्यासाठी वणवण, तहानेने कासावीस होणे, हे सगळं या भागातील नागरिकांना सवयीचं होऊन गेलं आहे. आता तर याच पाण्याने पाच निष्पापांचे बळी घेतले आहेत याची आपल्या पत्रात आठवण करुन देत राजू पाटील पालकमंत्री म्हणून वास्तवाकडे पाहण्याची विनंती केली आहे. तर या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल या पत्रात केला आहे. पाण्यासाठी नागरिक उर बडवून मागणी करत असतानाही तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमले आहे, त्यांच्या कानाशी तो आवाज पोहोचतच नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमच्या जीवावर उठलेला आयुक्त आम्हाला नको अशी थेट मागणी राजू पाटील यांनी केली आहे. 




तर या भागातील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी, कचरा आणि इतर समस्या मांडण्याचा आपण अनेकदा प्रयत्न केला मात्र यात नेहमीच राजकारण आडवे आले असून या दुर्दैवी घटनेनंतर तरी राजकारण बाजूला ठेवून 'मृत्यूकारण' तपासून पाहूया, असे सांगत पालकमंत्री म्हणून संबंधित अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक घेत तातडीने निर्णय घ्या आणि या गरिबांना न्याय द्या अशी विनवणी राजू पाटील यांनी केली आहे. "लाथ माराल तिथे पाणी काढणारे तुम्ही. कुठे आणि कशी लाथ मारायची ते तुम्हाला नक्कीच माहिती असणार," हे सांगायला देखील आमदार पाटील विसरलेले नाहीत. 


दरम्यान आमदार पाटील यांच्या भावनिक पत्रावर नगरविकासमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे .