मुंबई : रेमेडेसीवर आणि ऑक्सिजन टंचाईच्या चर्चेतून कुठे बाहेर पडत नाही, तोच आता नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे, ती लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची. गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अनेक नागरिकांना दुसरा डोस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. हे चित्र केवळ मुंबई पुरतेच मर्यादीत नसून राज्यातील सर्व भागात हीच परिस्थिती आहे. लसीकरण केंद्रावर लस आली तरी ती लवकर संपत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक ज्यांचा पहिला डोस मिळण्यात काही अडचण आली नाही मात्र त्यांना दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहे. 45 वर्षांवरील, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स या वर्गाकरिता लस पुरविण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली असून ज्यापद्धतीने त्यांच्याकडून लसीचा पुरवठा होईल त्यापद्धतीने लसीकरण केले जात आहे. दरम्यान, लसीकरिता अनाठायी धावपळ करण्यापेक्षा त्याच तारखेला लस घेण्याचा अट्टाहास न ठेवता, एक दोन आठवडे मागे पुढे झाले तरी काही फारसा फरक पडत नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे.
विशेष म्हणजे लसीकरणाच्या अनुषंगाने नागरिकांना देण्यात आलेल्या सूचना या दिवसागणिक बदलू शकतात. कारण जितका साठा येईल तोपर्यंत लसीकरण केंद्रावर लसी देणायचे काम सुरु असते. मात्र लस संपल्यानंतर कुणीच काही करू शकत नाही. नागरिकांनी राज्य शासनाची परिस्थितीत लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांचा हेतू जास्तीत जास्त लोकांना लस देणे हाच आहे.
याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "लोकांनी विनाकारण धावपळ करू नये. कोविशील्डसाठी 6 आठवड्यापासून तीन महिन्यापर्यंत लस घेता येऊ शकते. तर कोवॅक्सीनसाठी 6 आठवडे थांबू शकता. कोवॅक्सीनसाठी दुसरा डोस हवा असेल तर ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊ शकतात, मात्र कोविशील्डसाठी अगोदर वेळ घेऊन मगच लसीकरण केंद्रांवर गेले पाहिजे. नागरिकांनी सर्व गोष्टीची माहिती घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची ही वेळ आहे. लसीकरण जास्तीत जास्त व्हावे म्हणून वेग वेगळे प्रयत्न महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांना या लसीकरण मोहिमेत कोणताही त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहे, ड्राईव्ह व्हॅक्सिनेशन सुरु करण्यात आले आहे."
त्या पुढे असेही म्हणाल्या की,"18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी पाच केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यांना वेळ घेऊनच लसीकरण केंद्रावर यावे असे अपेक्षित आहे. लसीचा साठा वाढला की आपसूकच केंद्र आणखी वाढविण्यात येतील. लोकांनी सगळ्या परिस्थितीचा विचार करावा, आणि घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे. अनाठायी धावपळ करून नका. प्रत्येक सूचना लसीकरणाच्या अनुषंगाने प्रसार माध्यमातून देण्यात येत आहे."
राज्यात 16 जानेवारीला लसीकरण करण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून आतपर्यंत 1 कोटी 73 लाख 21 हजार 029 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तिसऱ्या गटातील 18 ते 44 वयोगटातील 2 लाख 15 हजार 274 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
राज्याच्या आरोग्य विभागातर्फे 6 मे रोजी जी माहिती देण्यात आली त्यामध्ये, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे. महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान (1 कोटी 35 लाख 97 हजार), गुजरात (1 कोटी 32 लाख 31 हजार), पश्चिम बंगाल (1 कोटी 14 लाख 75 हजार), कर्नाटक (1 कोटी 1 लाख 11 हजार) इतके लसीकरण झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :