मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरात कडक निर्बंध आहेत. गरजेचं आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तरीही नागरिकाचं बाहेर फिरणं मात्र पूर्णत: कमी झालेलं नाही. आपल्या हटके आणि अनोख्या ट्वीटमुळे कायमच चर्चेत असलेल्या मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरुन लोकांनी बाहेर पडू नये यासाठी पुन्हा एकदा आवाहन करण्यात आलं आहे.


महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजेच पु ल देशपांडे यांच्या भाषणातील एक क्लिप ट्वीट केली आहे. "....त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी तिथे सुखी राहा, आयुष्यात सगळ्याच महत्त्वाकांक्षा काही पुऱ्या होत नाहीत," असं पु ल देशपांडे यांचं वाक्य आहे.


 






तर दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही कोरोनापासून दूर राहण्यासाठी घराबाहेर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी ट्विटरवर टॉम अॅण्ड जेरी या लोकप्रिय कार्टूनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "कार्टूनमध्ये टॉमपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांना बाहेर पळावे लागते, पण खऱ्या आयुष्यात आपल्याला कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आत पळायचे आहे." मुंबई पोलीस ट्वीट






मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांचे बरेच ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबई पोलिसांनी कोरोना संसर्गापासून बचावापासून अनेक गोष्टींबाबत उत्तम ट्वीट केले आहेत. चित्रपटातील डायलॉग, वर्तमानातील घडामोडी, गेम्ससह विविध विषयांचा धागा पकडून केलेल्या ट्वीटचं नेटिझन्सनीही कौतुक केलं आहे.