(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2016 मधील निवृत्त सैनिकाला मारहाण प्रकरणी भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेश
शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2016 मधील माजी सैनिक मारहाण प्रकरणी उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत
मुंबई : शिवसैनिकांनी मुंबईतील माजी नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचा मुद्दा ताजा असतानाच, आता 2016 मध्ये माजी सैनिक सोनू महाजन यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी भाजपचे खासदार उन्मेष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
"माजी सैनिक जळगावातील चाळीसगावातील होते. तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2016 मध्ये सोनू महाजन या माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी भाजपचं सरकार असल्याने सोनू महाजन यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही, गुन्ह्याची नोंद झाली नाही. याविरोधात सोनू महाजन हायकोर्टात गेले. हायकोर्टाने सोनू महाजन यांची तक्रार दाखल करुन गुन्ह्याची नोंद करण्याचे निर्देश दिले. यानंतर 2019 मध्ये गुन्हा दाखल झाला. अशाप्रकारचे अनेक निवेदनं आल्यानंतर मारहाणी प्रकरणी उन्मेष पाटील आणि साथीदारांची चौकशी करण्याचे आदेश जळगावचे पोलीस अधीक्षक आणि सहकाऱ्यांना दिले आहेत," असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
शिवाय यासंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्वीटही केलं आहे.
२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 15, 2020
अनिल देशमुख आतापर्यंतचे सर्वात अपयशी गृहमंत्री : अतुल भातखळकर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ट्वीटनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. "अनिल देशमुख हे आतापर्यंतचे सर्वात अपयशी गृहमंत्री आहेत. एनसीपीचे एजंट म्हणून काम करणारे गृहमंत्री आहे असं म्हणत "ट्वीट का करतात? कारवाई करा ना, असं आव्हानही भातखळकर यांनी दिलं.