Dharavi Redevelop Project: मुंबईतील अतिशय मोक्याची जागा, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीत पुनर्विकासाची (Dharavi Redevelop Project) चक्रे आता वेगाने फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नव्याने काढलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या शर्यतीत अदानी समूहदेखील (Adani Group) उतरला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाशिवाय आणखी दोन विकासकांनी निविदा दाखल केली आहे. 


आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे. त्याशिवाय धारावीत विविध प्रकारचे लघुउद्योगही आहेत. त्यामुळे धारावीचे मुंबई आणि देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. मागील काही काळांपासून धारावी पुनर्विकासाची चर्चा सुरू होती. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi) ऑक्टोबर 2020 मध्ये आधीच्या सरकारने काढलेली निविदा प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली होती. 


तीन विकासकांचा सहभाग


धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेत तीन  विकासकांनी सहभाग घेतला आहे. अदानी समूह, नमन समूह आणि डीएलएफ कंपनीने धारावी पुनर्विकासात स्वायरस दाखवला. जवळपास 600 एकर जागेवर लाखो नागरिकांचे पुर्नवसन केले जाणार आहे. हा प्रकल्प 23 हजार कोटी रुपयांचा असणार आहे. या प्रकल्पासाठी हे विकासक पात्र आहेत का याबाबतच्या कागदपत्रांची तपासणी आता केली जाणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवासन यांनी दिली आहे. 


धारावी मोक्याची जागा


जुन्या मुंबईत काळात धारावी हे मुंबई शहराबाहेरील एक ठिकाण होते. या ठिकाणी खाडी, डम्पिंग ग्राउंड होते. त्याशिवाय चर्मोद्योग मोठ्या प्रमाणावर होते. शहर विकसित होत असताना या ठिकाणी  झोपड्यांची संख्या वाढू लागली. त्याचसोबत लघुद्योगांची संख्या वाढू लागली. मुंबईत सध्या धारावी हे  अतिशय मोक्याच्या ठिकाणी एका बाजूला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स असून या ठिकाणाहून शहरातील कोणत्याही भागात जाणे शक्य आहे. त्यामुळे धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर या परिसराचा आणि मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. धारावीत मोठ्या संख्येने छोटे-मोठे व्यवसाय असून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या व्यक्ती धारावीत स्थिरावल्या आहेत. साधारणपणे 10 लाख नागरीक धारावीत वास्तव्य करत आहे. पुनर्विकासात येथील लघुउद्योगांचे काय होणार, याचीही चर्चा सुरू होणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: