लॉकडाऊनमध्ये सायबर फ्रॉड वाढले, MONTBLANC नाव वापरुन बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक
लॉकडाऊनदरम्यान सायबर फ्रॉड करणारे गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. MONTBLANC हे नावाची बनावट वेबसाईट बनवून आणि एखाद्या व्यक्तीची माहिती मिळवून फसवण्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई : लॉकडाऊनमध्ये खोट्या वेबसाईट बनवून लोकांना फसवण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठीच महाराष्ट्र सायबर सेलने अलर्ट घोषित केला आहे. विशेषत: मों ब्लॉ (Montblanc) हे नाव असलेल्या वेबसाईटपासून सावध राहा, असं महाराष्ट्र सायबर सेलने सांगितलं आहे. या वेबसाईटवरुन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेशी निगडित असलेले कर्मचारी वगळता सर्व जण आपल्या घरी आहेत. अशा परिस्थितीत सायबर फ्रॉड करणारे गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. MONTBLANC हे नाव वापरुन बनावट वेबसाईटद्वारे फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने अलर्ट घोषित केला आहे. अशा कोणत्याही साईटवर क्लिक न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार सर्वात आधी MONTBLANC या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने एक मेसेज पाठवतात. हा मेसेज ते फेसबुकवर सुद्धा पोस्ट करतात.
या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की, "लॉकडाऊनमुळे MONTBLANC कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सवर मोठी सूट देत आहेत. शाईच्या पेनावर विशेष सूट देत आहोत, ज्याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा." यासाठी लोकांनी दिलेल्या साईटवर क्लिक करण्यास सांगितलं जातं.
लोकांना जे मेसेज पाठवले जातात त्यात https://montblancindia.co https://montblancsindia.com https://montblancindias.com https://montblancindia.org https://montblancindia.co.in
या लिंकचा समावेश असतो. साईटवर क्लिक करताच ग्राहकांची सर्व वैयक्तिक माहिती हॅकरकडे पोहोचते आणि हे भामटे त्यांची बँक खाती रिकामी करतात.
या साईटवर क्लिक करुन फसवणूक झाल्याच्या खूप तक्रारी महाराष्ट्र सायबर सेलकडे आल्या. त्यानंतर सायबर सेलने लोकांना याबद्दल माहिती दिली. तसंच ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी सायबर सेलशी संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.
दरम्यान, MONTBLANC नावाच्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे आहे अधिकृत विक्रेते TATA CLIQ आहे आणि त्यांची अधिकृत वेबसाईट [https://luxury.tatacliq.com/] अशी माहिती सायबर सेलने लोकांना जागरुक करण्यासाठी दिली आहे.
सोशल मीडिया मध्ये पोस्ट टाकताना सर्वांनी काळजी घ्यावी. अन्यथा सायबर क्राइम विभाग आपल्यावर कडक कारवाई करेल. लॉकडाऊन सुरू झाल्या पासून आज पर्यंत सायबर क्राइम विभागाने ४१० गुन्ह्यांची नोंद केली आहे, तसेच २१३ जणांना यासंदर्भात अटक केले आहे.@MahaCyber1#MaharashtraGovtCares pic.twitter.com/VjZtEc09k5
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020