मुंबई :  महाराष्ट्रात कोरोनाने गंभीर रुप धारण केलं आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे गरजेचं आहे. अशात आज राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे लसींच्या पुरवठ्या संदर्भात केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. 


गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रच्या जवळपास निम्मी आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्याही देशात सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पाठोपाठ सर्वाधिक डोस गुजरातला देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत 77 लाख, राजस्थान 74 लाख, उत्तर प्रदेश 73 लाख, पश्चिम बंगाल 66 लाख, कर्नाटक 49 लाख, मध्य प्रदेश 45 लाख, केरळ 40 लाख डोस असे काही प्रमुख राज्यातील प्रमाण आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक 82 लाख लसींचे डोस देण्यात आले आहे. मात्र, लोकसंख्या आणि कोरोना संक्रमित रुग्णसंख्येची तुलना केल्यास त्या प्रमाणात महाराष्ट्राला लसींचा पुरवठा होत नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.


..तरीही महाराष्ट्राला कमी डोस
देशात सर्वाधिक कोरोना संसर्ग आठ राज्यांमध्ये वाढत आहे. यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि केरळचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात गुजरातचा समावेश नाही. देशातल्या 56 टक्के केसेस एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्या महाराष्ट्राला केवळ 82 लाख डोस देण्यात आले आहेत. तर तीन टक्‍क्‍यांपेक्षा कमी केसेस असलेल्या गुजरातला आतापर्यंत 77 लाख डोस देण्यात आले आहे. यावरुन महाराष्ट्रासोबत केंद्र सापत्न वागत असल्याचे स्पष्ट होत आहे.


महाराष्ट्रात लसीचा तुटवडा
"महाराष्ट्रात 14 लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात लसीचे 14 लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान 40 लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडेचार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो." असंही ते म्हणाले. "केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्यापद्धतीने केलं जात नाही हे केंद्र सरकारला सांगणं आहे." अशी टीकाही राजेश टोपे यांनी केली.


माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन हा शब्द वापरू नका असं आवाहनही केलं. केवळ शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन आहे. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. "गरज लागल्यास ऑक्सिजनचं प्रमाण इंडस्ट्रीसाठी शून्य करुन टाकू, ऑक्सिजन लागणारे स्टीलचे प्लांट बंद ठेवू पण ऑक्सिजन कमी पडू देणार नाही." असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. थोडी जरी लक्षणं जाणवली तर लगेच चाचणी करुन घ्या. अंगावर दुखणं काढू नका, असं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला यावेळी केलं.