मुंबई : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असं वाकयुद्ध सुरु आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारमुळे संपूर्ण कोरोना लसीकरणा अभियानाला फटका बसत असून आपल्या अपयशाचं खापर केंद्रावर फोडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आता महाराष्ट्रातील काही नेत्यांनी हर्षवर्धन यांच्या आरोपांवर टीका केली आहे. तसंच राज्यातील लसीकरणाच्या परिस्थितीची दाखले दिले आहेत. लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांना लस न घेताच माघारी परतावं लागत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे पत्र लज्जास्पद आणि बेजबाबदार कृत्य असल्याची टीका महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.


महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. या दाव्यावरुन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी एक परिपत्रक पोस्ट करत त्यातून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.


Maharashtra Corona Vaccination: कोरोना लसीकरणावरुन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप


साठ्याअभावी लसीकरणाचा वेग मंदावू शकतो : सुप्रिया सुळे


यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची परिस्थिती सांगितलं. त्यांनी लिहिलं आहे की, "पुणे जिल्ह्यात आज 391 लसीकरण केंद्रांवर 55 हजार 539 जणांचं लसीकरण करण्यात आलं. लसीच्या तुटवड्यामुळे हजारो लोक लस न घेताच माघारी गेले. लसीचा साठा नसल्याने 109 केंद्रे आज बंद ठेवण्यात आली. साठ्याच्या अभावी लसीकरणाचा वेग मंदावू शकतो. जीव वाचवण्यासाठी, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लवकरात लवकर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रत्येकाला लस देण्याचा आमचा निर्धार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना विनंती आहे की कोरोना लसीबाबत मदत करावी." 






 


केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं पत्र लज्जास्पद आणि बेजबाबदार कृत्य : सत्यजीत तांबे


केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे पत्र लज्जास्पद आणि बेजबाबदार कृत्य आहे, तसंच हा सर्व कोरोनाविरुद्ध संघर्ष करणार्‍या महाराष्ट्रातील लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान आहे, अशी टीका महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.