मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असताना प्रतिबंधात्मक उपायांवर जोरदार चर्चा संपूर्ण देशात आणि राज्यात होताना पाहिला मिळत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासन विविध प्रयत्न करत असताना या आजाराविरोधातील लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे त्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'छोटा सायन हॉस्पिटल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी येथील नागरी आरोग्य केंद्रात खास धारावीतील पात्र नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुंबई महानगपालिकने घेतला आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अशा पद्धतीने पावले उचलली जावीत आणि अशाच पद्धतीने सामुदायिक लसीकरण केंद्र राज्यातील विविध उभारण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे. 


कोरोना लसीकरण सुरु होऊन बऱ्यापैकी काळ लोटला असलात तरी आजही राज्यात रोज ठरलेल्या उद्दिष्टामप्रमाणे लाभार्थ्यांचे लसीकरण होत नाही. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे उद्दिष्ट खासगी आणि सरकारच्या रुग्णालयातून पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांना सध्या राज्यात लस दिली जात आहे. या कामासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला उच्च, मध्यवर्गीय घरातील नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत. मात्र चाळीतील, वस्त्यांमधील आणि  ग्रामीण खेड्यातील नागरिक फार कमी प्रमाणात लसीकरणासाठी नोंदणी करताना आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागणार आहेत. 




याप्रकरणी, मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "धारावी येथील नागरी आरोग्य केंद्रात हे लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे, यामुळे या परिसरातील पात्र नागरिकांना लसीकरणासाठी बाहेर जावे लागणार नाही. त्याचप्रमाणे या परिसरात आम्ही काही सामाजिक संस्थाच्या मदतीने मदत केंद्र सुरु करत आहोत. त्या ठिकाणी लसीकरण नोंदणीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविणार आहोत. त्यांना येथे स्पॉट रेजिस्ट्रेशन करून नागरिक आरोग्य केंद्रात थेट लसीकरणासाठी जाता येईल. ज्या कोणाला कोविन अॅपमध्ये नोंदणी करण्यासाठी अडचणी येतील त्यांना या केंद्रावरून मदत केली जाईल. यामागे पात्र नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग जास्तीत जास्त नोंदवावा हा आहे. या कामासाठी येथील काही खासगी डॉक्टरांची मदत घेणार आहोत. या उपक्रमामुळे जे नागरिक केंद्रावर लसीकरणासाठी विविध कारणांमुळे जात नव्हते आता जाऊ शकतील."     


16 जानेवारीला लसीकरण मोहिमेला सुरवात झाल्यापासून राज्यात 18 मार्चच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 38 लाख 40 हजार 707 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 11 मार्च रोजी एका दिवसांत 2 लाख 28 हजार 550 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करणे बाकी आहे. राज्यात जेष्ठांसह 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले आहे. जमेल त्या पद्धतीने तांत्रिक गोंधळावर मात करत राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. मात्र या लसीकरण केंद्रांची संख्या वाढली पाहिजे असा सूर कायम आहे.  




 
पुणे येथील श्वसन विकारतज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांच्या मते, "लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडावे लागतील. लसीकरण सुविधेचे सुलभीकरण केले पाहिजे. सध्या ग्रामीण भागात काही ठिकाणी राहत्या घरापासून लसीकरण केंद्र खूपच लांब असल्याची महिती माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे ही लसीकरण केंद्र शास्त्राला धरून जवळच्या ठिकाणी  सामुदायिक लसीकरण केंद्र सुरु करावी लागणार आहे. अनेक वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणे काही कुटुंबियांना जिकिरीचे जात आहे. या वेळी ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून काही नागरिकांना ज्यांना  खरंच केंद्रावर येणे अशक्य आहे अशा व्यक्तींसाठी असे काही प्रयत्न होण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी या कामी प्रशासनाची मदत करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सध्या गावाकडे उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे याचा विचार करून लसीकरण मोहिमेचे नियोजन केले पाहिजे."   
       
तर वर्षभर कोविडच्या रुग्णांवर उपचार करणारे परळच्या ग्लोबल रुग्णालयातील डॉ. समीर गर्दे सांगतात की, "गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने व्हायला पाहिजे जेणेकरून लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांना या लसीमुळे संरक्षण मिळू शकेल. मात्र अनेक ठिकाणी अजूनही लसीकरणाचा वेग अपेक्षित आहे, तसा दिसत नाही. त्यामुळे लसीकरणाची केंद्रं वाढविली पाहिजे. ज्या ठिकाणी रुग्णांचा प्रादुर्भाव अधिक आहे, त्या ठिकाणी जाऊन लसीकरणाबाबतीत जनजागृती केली पाहिजे. तसेच शक्य असल्यास जवळच्या ठिकाणी समुदायिक लसीकरण केंद्रे उभारली पाहिजे. तसेच लसीकरण नोंदणी करणे जर शक्य नसेल त्यासाठी मदत केंद्र उभारली पाहिजेत. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे, त्यामुळे लसीकरण प्रक्रियेतील 'कोल्ड चैन' व्यवस्थित राहील याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे."


महत्त्वाच्या इतर बातम्या :