बीड : राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतानाच तिकडे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उस्मानाबादच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन युनिटची उभारणी करण्यात येत आहे. काय आहे कोरोना रुग्णाच्या उपचाराची स्थिती. पाहूया स्पेशल रिपोर्ट.


बीड जिल्ह्यात केवळ एकच आरटीपीसीआर टेस्टिंग लॅब आहे आणि ती आहे अंबाजोगाई मधल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयमध्ये. यामध्ये रोज पाचशे ते सहाशे कोरोनाच्या टेस्ट केल्या जाऊ शकतात. मात्र, मागच्या पंधरा दिवसांपासून या लॅबमधील तीन शिफ्टमध्ये दिवसभरात दोन हजारपेक्षा जास्त टेस्ट केल्या जात आहेत.


मागच्या आठवडाभर बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सगळ्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र, या वाढलेल्या रुग्णांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांची गैरसोय होत असल्याने रुग्ण हॉस्पिटलमधून पळून जाण्याचे प्रकार देखील वाढले आहेत.


कोरोना रुग्णांना जितका औषध उपचार गरजेचा आहे, त्याहीपेक्षा आवश्यक आहे तो म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा. बीड जिल्ह्यामध्ये लोखंडी सावरगाव आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन प्लांट बसवण्यात आले आहेत. बीडच्या जिल्हा रुग्णालयात देखील असाच प्लान्ट उभा आहे. मात्र, अद्याप त्यातून पाहिजे तेवढ्या ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकलेला नाही.


कोरोनाच्या संदर्भात सुनील केंद्रेकर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत अधिकार्‍यांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी अशी तंबी त्यांनी अधिकार्‍यांना दिली.


सध्या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात बहुतेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. पण, या वाढणाऱ्या रुग्णांच्या संदर्भात उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडताना पाहायला मिळत आहे. परिस्थिती आपत्तीजनक असली तरी यात व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.