मुंबई : कोरोनाच्या उद्रेकाला रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य आहे. कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनानं आक्रमक पवित्रा घेतला आहेत. मिशन टेस्टिंगअंतर्गत मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अॅन्टिजन चाचण्या होणार आहेत.
मुंबईतील 25 प्रमुख मॉल मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अॅन्टिजन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पॅलेडियम, फिनीक्स, रुणवाल, इन्फिनीटी , इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं लोक येतात. विक एन्डला मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते. मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अॅन्टिजेन चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल.
खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटस् च्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे 7 मुख्य रेल्वे स्थानकं त्यात वांद्रे, दादर बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत. विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असेल.
मुंबईतील मुख्य बस स्थानक दादर , परळ येथे दररोज 1000 प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य आहे. सध्या 20 ते 23 हजार टेस्ट दिवसाला होत आहेत.
खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरण वाढवण्यासाठीही पाऊल
खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरण वाढवण्यासाठीही पालिका कडक पावले उचलणार आहे. मुंबईतील 43 खाजगी हॉस्पिटल लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. मात्र, खाजगी हॉस्पिटलमध्ये दरदिवसाला किमान 1 हजार लसीकरण करण्याची सक्ती करण्यात येणार आहे. सध्या सरासरी 45 हजार लोकांचे मुंबईत दररोज लसीकरण होतेय. यांपैकी केवळ 5 हजार लोकांचे लसीकरण खाजगी हॉस्पिटलमध्ये होतेय. लसीकरणाची अपेक्षित संख्या गाठता आली नाही आणि सोबतच नियमाप्रमाणे योग्य सुविधा नसतील तर खाजगी हॉस्पिटलचे लसीकरण करण्याचे अधिकार प्रशासन काढून टाकणार आहे. त्यामुळे, खाजगी लसीकरण केंद्रांना प्रशासनानं लसीकरण बुथ वाढवण्याच्या, योग्य सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात आणि मुंबईतही कोविड रुग्णसंख्येचा उच्चांक
राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 24 हजार 896 रुग्ण एका दिवसात आढळले होते. काल 25 हजार 833 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतही आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण दिवसभरात आढळले आहेत. मुंबईत तब्बल 2877 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. यापूर्वी, 7 ऑक्टोबर 2020 रोजी 2848 रुग्णांचं निदान झालं होतं.