ठाकरे गटाची तक्रार, निवडणूक आयोगाच्या कारवाईची भीती; मनसेने शिवाजी पार्कातील इंजिनाचं चिन्हं असलेले कंदील हटवले
MNS Deepotsav 2024 : मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमामुळे निवडणूक आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता.
मुंबई : एकीकडे राज्यात दिवाळीची (Diwali 2024) धामधूम सुरु असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच दादर परिसरातील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपोत्सवाचे (MNS Deepotsav) आयोजन करण्यात आले आहे. मनसेच्या दिपोत्सवात मनसेकडून लावण्यात आलेल्या कंदीलावर शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करण्यात आली होती. यावरून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा वाद पुन्हा एकदा रंगला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना तक्रार दिली आहे. मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमामुळे निवडणूक आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. या दीपोत्सवात मनसेचे माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे (Amit Thackeray) उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी देखील शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
मनसेने दिपोत्सवातील कंदील हटवले
मनसेकडून दिपोत्सवात मनसेचे चिन्ह आणि नाव असलेले भगवे कंदील लावले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिपोत्सवात कंदील लावून मनसे अप्रत्यक्ष प्रचार करित असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे. यानंतर आता मनसेने दिपोत्सवातील कंदील हटवले आहेत.
उबाठाचा हिंदू सणांना विरोध : संदीप देशमुख
दरम्यान, ठाकरे गटाने दिपोत्सवावर आक्षेप घेतल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे. हिरवे कंदिल लागले असते, तर विरोध केला असता का? उबाठाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदच लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर उबाठाने विरोध केला असता का? भेडींबाजारमध्ये जाऊन ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? ईदमध्ये डीजे लावतात त्यांना विरोध करता का? मग हिंदू सणांना विरोध का? उबाठाची भूमिका हिंदू सण विरोधी असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा