Nitin Gadkari : मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त 12 तासांत पूर्ण करु शकणाऱ्या आरामदायी इलेक्ट्रिक बसगाड्या निर्मितीची योजना आखावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना केले आहे.  नितीन गडकरी यांच्या हस्ते, आज मुंबईत स्विच ईआयव्ही 22 (Switch EiV 22) या नावाच्या अशोक लेलँड कंपनीच्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 'दीर्घकालीन दृष्टिकोन लक्षात घेता,  देशाच्या  वाहतूक व्यवस्थेत परिवर्तन करण्याची गरज आहे. शहरी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देत, आम्ही कार्बन उत्सर्जन कमीत कमी असेल तसेच जास्त  प्रवासी क्षमता असलेल्या एकात्मिक इलेक्ट्रिक वाहनांची वाहतूक व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्नरत आहोत.' ग्राहकांकडून हरित (पर्यावरणस्नेही) वाहतूक साधनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आहे, हे बघता, केंद्र सरकारची दूरदृष्टी आणि धोरणे इलेक्ट्रिक वाहनांचा अंगीकार करण्याला प्रोत्साहन  देणारी आहेत” असेही यावेळी त्यांनी सांगितलं.  


मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रीक बसचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि इतर अधिकारीदेखील असतात. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,  आज डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात येत असल्याने मी आनंदित आहे. प्रदुषण मुक्त देशासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. एकूण प्रदूषणांपैकी 35 टक्के प्रदूषण हे पेट्रोल आणि डिझेलमुळे होत आहे. इलेक्ट्रीक वाहनांमुळे प्रदूषणात घट होईल असेही त्यांनी सांगितले.


यावेळी, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाविषयीची आपली संकल्पना सांगतांना नितीन गडकरी म्हणाले, नरिमन पॉइंट ते  दिल्ली जोडण्याची माझी योजना आहे आणि त्याचे 70 टक्के काम याआधीच पूर्ण झालेले आहे. यावेळी, वाहन उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देत, गडकरी यांनी त्यांना आवाहन केले की, मुंबईहून दिल्लीला केवळ 12 तासांत पोहोचता येईल, अशी क्षमता असणाऱ्या आरामदायी बसेसची निर्मिती करा. 






वाहनांसाठी विजेचा इंधन म्हणून वापर होणे, हे डिझेलसारख्या इतर इंधनांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. कच्च्या तेलाची आयात हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. तसेच, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर देखील वीजेचा खर्च कमी करण्यात मोठा हातभार लावतो आहे, असे त्यांनी सांगितले.  


आणखी वाचा :
Mumbai AC Double Decker Bus: 'बेस्ट'चं आधुनिक पर्व सुरू; देशातील पहिल्या एसी डबलडेकर बसचे उद्घाटन
Electric Double Decker Bus : कशी आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस?