Raigad Suspicious Boat: रायगडमध्ये आढळलेल्या संशयास्पद बोटीमुळे राज्यात खळबळ उडाली. मात्र, या बोटीमागे दहशतवाद्यांचा हात नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी यानिमित्ताने सागरी सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. 26/11 हल्ल्यानंतर  देशाची सागरी सुरक्षा व्यवस्था कठोर केली असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, आजच्या या घटनेमुळे या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. 


घटना काय?


श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्या. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन-तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. ही बोट आढळून आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. 


काही स्थानिकांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने  पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदारांनी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. 


ही बोट आली कुठून?


ही बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच एका जहाजाने सुटका केली. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली. 


सागरी सुरक्षेत चूक?


सागरी सुरक्षा व्यवस्थेत तीन स्तर समजले जातात. यामध्ये राज्य सागरी पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल असे तीन स्तर असतात. या तिन्ही यंत्रणांची स्वत: ची हद्द असते. राज्य सागरी पोलीस किनाऱ्यापासून 22 किमी पर्यंतच्या हद्दीत काम करतात. तर, तटरक्षक दल हे 22 किमी ते 370 किमीपर्यंत काम करतात. नौदलाची मुख्य जबाबदारी ही 370 किमीपासून ते सागरी सीमेपर्यंत असते.  त्यानुसार या यंत्रणा काम करत असतात. या यंत्रणांकडे सागरी सुरक्षेची जबाबदारी असते. रायगडच्या किनाऱ्यावर आलेली बोट ही ओमानमधून आली असल्याची माहिती समोर आली. 


ओमान ते भारतात सागरी मार्गाने येत असताना पाकिस्तानच्या समुद्र हद्दीतून मार्गक्रमण करावे लागते. ओमान ते भारत हे साधारणपणे 1562 किलोमीटरचे अंतर आहे. एवढे अंतर पार करत ओमानमधून एके-47 सह या बोटीने थेट रायगडचा किनारा गाठला. जवळपास एक हजार नॉटिकलचे अंतर कापून सागरी सुरक्षेचे तीन स्तर भेदून ही बोट रायगडच्या किनाऱ्यावर आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.