(Source: Poll of Polls)
कोल्हापूर जिंकलं, मुंबईचं काय? शिवसेनेला 'धनुष्य' चालवायला 'हाता'ची गरज लागणार
कोल्हापूरनंतर मुंबईत काँग्रेसने आपला हात शिवसेनेच्या धनुष्यावर ठेवावा मग तीर कुठे चालवायचे हे एकत्र मिळून ठरवू, अशी रणनीती सध्या दोन्ही पक्षात सुरु आहे. नेमकं काय सुरु आहे? कशी मदत मिळणार?
मुंबई : 'आमचं ठरलंय' असा नारा दिला आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. ढोल वाजले, गुलाल उधळला, जल्लोष झाला काँग्रेस कार्यकर्ते खुश झाले पण शिवसेनेचे काय? महाविकास आघाडी करता करता शिवसेनेचं तसं नुकसानच झालं. आगामी मुंबई महापालिकेत काँग्रेसने 'एकला चलो'चा नारा दिला आहे. मुंबईत शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसची ताकद फारशी नाही. कोल्हापुरात शिवसेनेने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला, आता काँग्रेसने शिवसेनेसाठी मुंबईत शब्द पाळण्याची शिवसेनेची अपेक्षा आहे.
आता ही मदत कशी घ्यायची यावर सध्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरु झाली आहे. मुंबईत काँग्रेसने ज्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकांची मतं मिळवली आहे तिकडे शिवसेनेचं लक्ष आहे. शिवसेनेला थेट मनसे आणि भाजपला भिडावं लागणार आहे. शिवसेनेला धनुष्य चालवण्यासाठी शेवटी हाताची गरज तर लागणार आहे. भाजप, मनसे आणि शिवसेना या तीन पक्षांमध्ये मुंबईत घमासान होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीत असल्याने शिवसेना
या दोन पक्षांसाठी व्यूहरचना तयार करत आहेत.
2017 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईत काँग्रेसचे 29 तर राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 84 उमेदवार जिंकले होते तर भाजपचे 82 उमेदवार होते. भाजपने जिंकलेल्या 82 जागांपैकी 67 जागांवर शिवसेना दोन नंबरवर राहिली. तर काँग्रेसने 35 ठिकाणी दोन नंबरची मतं घेतली आणि तब्बल 75 ठिकाणी तीन नंबरची मतं घेतली आहेत
काँग्रेसने दोन आणि तीन नंबरची मतं घेतलेल्या प्रभागांवर आता शिवसेनेची नजर राहणार आहे. काँग्रेस नगरसेवकांचे मूळ वॅार्ड सोडून इतर भागात शिवसेनेला कशी मदत होईल यावर रणनीती सुरु आहे.
थेट काँग्रेसला सोबत घेणं शिवसेनेला परवडणार नाही. मुंबईत काँग्रेसमध्ये प्रचंड अंतर्गत वाद आहेत याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे ती शिवसेनेकडे कशी वळवता येईल यावरच जास्त भर असेल.
एक नजर टाकूया मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 2
अभासे – 1
एकूण – 227
बहुमताचा आकडा – 114
मनसे आणि भाजपची वाटचाल लक्षात घेता शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तितकी सोपी नसणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत शिवसेनेला घ्यावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता ही मदत काँग्रेस खुलेपणाने करणार की शिवसेनेच्या पाठिशी राहून पदड्यामागून करणार हे पाहावं लागेल.