मुंबई: राममंदिर भूमिपूजनाच्या विरोधात याचिका आणि निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचं काम भाजप पदाधिकाऱ्याला दिल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर एक नाव चर्चेत आहे. साकेत गोखले. साकेत गोखले हे ठाण्यातील रहिवासी आहेत. राममंदिर भूमीपूजनाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर आता त्यांना पोलिस सुरक्षा प्रदान केली आहे. कारण त्यांच्या ठाण्यातील घराबाहेर आरएसएसच्या लोकांनी घोषणाबाजी केली. त्यांच्या आईला धमकी दिली असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिलेत. यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांना सुरक्षा देखील पुरवली आहे.

साकेत गोखले कोण?

  • साकेत गोखले हे ठाण्यात राहतात.

  • ते पत्रकार आहेत, त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी म्हणून काम केलंय.

  • ते आरटीआय कार्यकर्ते देखील आहे. त्यांनी या माध्यमातून अनेक प्रकरणं बाहेर काढलीत.

  • काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात.

  • राहुल गांधीच्या समर्थानार्थ तसेच भाजप सरकारच्या धोरणांविरोधात ते ट्विटर लिहित असतात.




5 ऑगस्टच्या प्रस्तावित भूमीपूजनाला विरोध

अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचं भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र या प्रस्तावित भूमीपूजनाला विरोध करण्याची मागणी करत साकेत गोखले यांनी एक याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली आहे. यात राममंदिराचं भूमीपूजन म्हणजे अनलॉक 2 च्या गाईडलाईन्सचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. साकेत गोखले यांनी हायकोर्टात चीफ जस्टिस यांना लेटर पीआयएलच्या माध्यमातून ही याचिका केली आहे. गोखले यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे की, भूमीपूजन कोविड-19 च्या अनलॉक-2 गाईडलाईन्सचं उल्लंघन आहे. याचिकेत म्हटलं आहे की, अयोध्येमध्ये भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी 300 लोकं एकत्रित होतील, जे कोविड 19 च्या नियमांच्या विरोधी आहे. यात असं देखील म्हटलं आहे की, या कार्यक्रमामुळं कोरोनाचं संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. केंद्राच्या गाईडलाईन्समधून यूपी सरकारला सूट मिळू शकत नाही. जर ही लेटर पिटीशन मंजूर झाली तर चीफ जस्टिस यांनी नियुक्त केलेल्या खंडपीठात या प्रकरणी सुनावणी होईल. या याचिकेत राममंदिर ट्रस्टसोबत केंद्र सरकारला देखील पक्षकार बनवलं आहे. आपल्या याचिकेत गोखले यांनी बकरी ईदला सामूहिक नमाज करण्याची परवानगी दिली नव्हती, याचा देखील उल्लेख केला आहे.

राम मंदिर भूमीपूजनाला विरोध, अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचं काम भाजप पदाधिकाऱ्याला
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचे काम भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित कंपनीला दिल्याचा गंभीर आरोप साकेत गोखले याने ट्विटरवर केला होता. त्याच्या माहितीनुसार भाजप पदाधिकारी आयटी सेल सांभाळणाऱ्या देवांग दवे याची कंपनी आणि निवडणूक आयोगाने ज्यांना काम दिलं त्याच्या कंपनीचा पत्ता एकच आहे. विशेष म्हणजे सोशल सेंट्रल या ज्या कंपनीला काम दिले त्या कंपनीच्या ग्राहकांच्या लिस्टमध्ये भाजप आहे. त्यामुळे या कंपनीने मतदारांच्या माहितीचा गैरवापर केला का? यावर साकेत गोखले यांनी प्रश्न उपस्थित केला. तसंच निवडणूक आयोगाकडील महत्वाची आणि गोपनीय माहिती वापरली गेली का? यावरही साकेत गोखले यांनी ट्विटरवरून प्रश्न उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाने या ट्विटची दखल घेऊन या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल देखील मागवला. गोखले यांनी केलेल्या आरोपानंतर काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलीय.

निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम : पृथ्वीराज चव्हाण