प्रयागराज: अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचं भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र या प्रस्तावित भूमीपूजनाला विरोध करण्याची मागणी करत एक याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली आहे. हायकोर्टात एका पत्रकाराने ही याचिका दाखल केली आहे. यात राममंदिराचं भूमीपूजन म्हणजे अनलॉक 2 च्या गाईडलाईन्सचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.

दिल्लीचे पत्रकार साकेत गोखले यांनी हायकोर्टात चीफ जस्टिस यांना लेटर पीआयएलच्या माध्यमातून ही याचिका केली आहे. गोखले यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे की, भूमीपूजन कोविड-19 च्या अनलॉक-2 गाईडलाईन्सचं उल्लंघन आहे.

याचिकेत म्हटलं आहे की, अयोध्येमध्ये भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी 300 लोकं एकत्रित होतील, जे कोविड 19 च्या नियमांच्या विरोधी आहे. यात असं देखील म्हटलं आहे की, या कार्यक्रमामुळं कोरोनाचं संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. केंद्राच्या गाईडलाईन्समधून यूपी सरकारला सूट मिळू शकत नाही. जर ही लेटर पिटीशन मंजूर झाली तर चीफ जस्टिस यांनी नियुक्त केलेल्या खंडपीठात या प्रकरणी सुनावणी होईल. या याचिकेत राममंदिर ट्रस्टसोबत केंद्र सरकारला देखील पक्षकार बनवलं आहे.

राम मंदिर भूमिपूजनाची वेळ अशुभ; शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती याचं निवेदन

बकरी ईदच्या सामूहिक नमाजच्या परवानगीचा उल्लेख
आपल्या याचिकेत गोखले यांनी बकरी ईदला सामूहिक नमाज करण्याची परवानगी दिली नव्हती, याचा देखील उल्लेख केला आहे. पत्रकार साकेत गोखले यांनी अनेक विदेशी वृत्तसंस्थासाठी काम केलं आहे तसंच सोशल अॅक्टिव्हिस्ट देखील आहेत.

राम मंदिर भूमिपूजनाची वेळ अशुभ: शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती
राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तारखेवर जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून हा मुहूर्ताची वेळ अशुभ असल्याचं सांगितलं आहे. शंकराचार्य सरस्वती म्हणाले की, 'आम्हाला कोणतेही पद नको किंवा राम मंदिराचे विश्वस्थही व्हायचे नाहीये. आमची इतकीच इच्छा आहे की, मंदिराचं काम व्यवस्थित व्हायला हवं आणि योग्य वेळी पायाभरणी करायला हवी. पण, सध्याची ही वेळ अशुभ वेळ आहे.' तसेच मंदीर जनतेच्या पैशातून उभारले जाणार आहे, त्यामुळे मंदिराच्या बांधकामासंदर्भात लोकांचीही मतं जाणून घ्यायला हवीत, असंही ते म्हणाले.


5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरांचं भूमीपूजन
देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसते आहे. उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहतील. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. कोरोनाच्या काळात फार गर्दी होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येतेय. अगदी 100 ते 150 लोकांच्याच उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचं नियोजन आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे देखील पाहणं महत्वाचं असेल.

संबंधित बातम्या 

Ram Mandir | ठरलं!, अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन
राम मंदिराच्या कामाचा मुहूर्त ठरला, असं असेल राममंदिर!