Sanjay Raut on Rajya Sabha Election : राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati ) 42 मतांची तजवीज केली का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी केला आहे. आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमचा संभाजीराजेंना विरोध नसल्याचेही राऊत म्हणाले. मला बाकी काही माहिती नाही पण शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेत जाणार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
शिवसेना अनेक वर्षापासून राजकारणात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ज्याअर्थी एकादा उमेदवार मी लढणार असे जाहीर करतो, तेव्हा त्यांनी निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची बेरीज केलेली असते. निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज लागते. त्या मतांची जमवाजमव संभाजीराजेंनी केली असेल असेही राऊत यावेळी म्हणाले. त्यांना कोणीतरी पाठिंबा देत असणार असेही ते म्हणाले.
राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे गरजेचं
आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे. अपक्ष नाही, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही मग ते कोणीही असो असे राऊत यावेळी म्हणाले. आम्ही संभाजीराजेंना सांगितले की तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा. कारण राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे आम्हाला गरजेचे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले मागं जातो, तुम्ही छत्रपती आहात असेही राऊत यावेळी म्हणाले. आता निर्णय त्यांचा आहे. पण कोणत्याही परिस्थितीत दोन उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील असे राऊत म्हणाले. ये मेरे मन की बात नही ये उद्धवजी यांची मन की बात असल्याचे संजय राऊत म्हणाले. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, कारण या आमच्या जागा आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: