Shiv Sena MP Sanjay Raut Press Conference : वैफल्यातून भाजपचे महाविकास आघाडीवर आरोप सुरु आहेत, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र पडलंय का? असा सवाल किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयानं दिलेल्या अटकपूर्व जामीनावर बोलताना संजय राऊतांनी विचारला आहे. तसेच, मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळताना विचारलेल्या प्रश्नाचं काय? असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, विक्रांतसाठी जमा केलेल्या प्रश्नांचा हिशोब द्या, असं म्हणत पुन्हा एकदा राऊतांनी सोमय्यांना चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त लवकरच किरीट सोमय्यांचा 'टॉयलेट घोटाळा' बाहेर काढणार, असल्याचं सांगत संजय राऊतांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. 


विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशांचं काय झालं? हे सांगा : संजय राऊत 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "उद्या जर दाऊद इब्राहिम बसला आणि महाराष्ट्रातले घोटाळे उघड करु लागला, तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? कारण तो गुन्हेगार आहे. दाऊदनं जसं दहशतवादावर बोलू नये तसं आयएनएस विक्रांत सारख्या राष्ट्रीय प्रश्नावर ज्यांनी घोटाळा केला आहे. लोकभावनेशी खेळलेले आहेत आणि जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झालेले आहेत. अशांनी दुसऱ्यांवर असे खोटे आरोप करणं बरोबर नाही. लोकं विश्वास ठेवणार नाहीत. आधी तुम्ही तुमचे हिशोब द्या. विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशांचं काय झालं? हे सांगा."


या महाशयांचा 'टॉयलेट घोटाळा' बाहेर काढणार : संजय राऊत 


"लवकरच मी या महाशयांचा एक 'टॉयलेट घोटाळा' बाहेर काढणार आहे. मिरा-भाईंदर महापालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा 'टॉयलेट घोटाळा' झालाय. म्हणजे, कुठेकुठे पैसे खातात, तर विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत. याबाबतचे सर्व कागदपत्र सुपूर्द झालेली आहे. युवा प्रतिष्ठान नावाची जी एनजीओ चालवत होते, ही लोकं. त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा 'टॉयलेट घोटाळा' केलाय. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन पैसे काढले. हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. आता तुम्ही फक्त खुलासे करत बसा. या सर्व विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवं." तसेच, पुढे बोलताना भाजपाचा टॉयलेट घोटाळा सुद्धा महाराष्ट्रात दुर्घंधी निर्माण करणार असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला आहे.