एक्स्प्लोर
खंबाटातील कर्मचाऱ्यांना शिवसेनेनं वाऱ्यावर सोडलं, राष्ट्रवादीचा आरोप

मुंबई: खंबाटा प्रकरणात मध्यस्थी करणारी शिवसेना आणि त्यांच्या खासदारांनी कामगारांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी केला आहे. इतकंच नाही. तर कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना मुख्यमंत्र्यांनीच पाठीशी घातल्याचा सनसनाटी आरोपही पावसकर यांनी केला आहे. आज एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. 2014 पासून खंबाटा ही कंपनी दिल्लीतल्या टर्बो एव्हिएशनने विकत घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत प्रयत्न करत होते. असा दावाही पावसकर यांनी केला आहे. पण कंपनी टेक ओव्हर करताना कामगारांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोपही पावसकर यांनी केला आहे. आता फक्त निवडणूक डोळ्यासमोर असल्यानं मतांच्या राजकारणासाठी शिवसेना मदतीचं नाटक करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकरणी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेपाची मागणी करणार असल्याचा मनसुबाही त्यांनी व्यक्त केला आहे. खंबाटा या कंपनीमध्ये 3 हजार कर्मचारी आहेत. जे कंपनीच्या विक्रीमुळे वाऱ्यावर आहेत. त्यांचे 400 कोटींहून अधिक रुपये थकवल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांचं वय अवघं 25 ते 30 वर्षे आहे. कालच आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांचं गाऱ्हाणं मांडलं होतं.
आणखी वाचा























