अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने केडीएमसीच्या उपमहापौरांना दालनात घुसून धमकी, आरोपीला अटक
भाजपच्या टिटवाळ्यातील नगरसेविका उपेक्षा भोईर या केडीएमसीच्या उपमहापौर आहेत. भोईर यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी उमेश साळुंखेला अटक केली आहे.
कल्याण : अनधिकृत बांधकामांची तक्रार केल्याने कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) उपमहापौरांना दालनात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी धमकी देणाऱ्या भूमाफियाला बेड्या ठोकल्या आहेत.
भाजपच्या टिटवाळ्यातील नगरसेविका उपेक्षा भोईर या केडीएमसीच्या उपमहापौर आहेत. त्यांच्या प्रभागात उमेश साळुंखे या व्यक्तीने काही अनधिकृत बांधकाम केल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या. याबाबत उपेक्षा भोईर यांनी केडीएमसीत अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्याकडे अधिकारी वर्गाने लक्ष न दिल्यामुळे भोईर यांनी महासभेत याबाबत लक्षवेधी उपस्थित केली.
यानंतर उमेश साळुंखे याने थेट उपमहापौरांचं दालन गाठत आपल्याला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भोईर यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत साळुंखे याला अटक केली आहे.
उमेश साळुंखे याने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून उलट उपेक्षा भोईर यांनीच आपल्याला धमकी दिल्याचा आरोप करत महापालिका अधिकारी याचे साक्षीदार असल्याचा दावा केला आहे.