Kalyan News : कल्याण शीळ या रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरन करण्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र संथगतीने आणि निष्काळजीपणे सुरु असलेल्या या कामामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. यामुळे वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या मध्यभागी भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी काही डक्ट सोडण्यात आले आहेत. या डक्टना संरक्षित करण्यात आलेले नसल्यानं अंधारात त्यांचा अंदाज न आल्यानं या अपघातांची संख्या वाढली आहे. आज पहाटेच्या सुमारास देखील मानपाडा नजीक असाच एका ठिकाणी डक्टचा अंदाज न आल्यानं कारचा अपघात झाला. या अपघातात सुदैवानं वाहनचालक बचावला असला, तरी कारचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर सदर ठिकाणी माती टाकून डक्ट बुजवण्याच काम सुरु करण्यात आलं आहे.
कल्याण शीळ रोड वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून या रस्त्यावर 24 तास मोठ्या प्रमाणात रहदारी असते. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कल्याण ते शीळ या रस्त्याचे 6 पदरी रुंदीकरण आणि काँक्रिटिकरनाचे काम मागील 2 वर्षांपासून सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या मध्यभागी ठराविक अंतरावर भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी डक्ट सोडले आहेत. आधीच रस्त्याचे काम करताना जागोजागी अर्धवट काम सोडण्यात आले असल्यानं उंच सखल रस्त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.
भूमिगत वाहिण्यासाठी ठेकेदाराने रस्त्यात मध्यभागी ठिकठिकाणी डक्ट साठी जागा सोडली असली, तरी अद्यापी हे डक्ट बंदिस्त करण्यात आलेले नाहीत. तर या ठिकाणी खड्डा असल्याची माहिती देण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्यामुळं खड्ड्याचा अंदाज न येणारे वाहनचालक रिकाम्या रस्त्यावरून वेगानं येताना या खड्ड्यात पडून जायबंदी होत आहेत. वारंवार या खड्ड्यामुळं अपघात होत असतानाही प्रशासनाकडून हे अपघात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळं वाहनचालक संतापले आहेत. अपघात झाल्यानंतर या ठिकाणचे डक्ट बुजवण्यात येतात. काल रात्री देखील अशाच एका डक्टचा अंदाज न आल्यानं अपघात झाला. संथगतीने सुरु असलेल्या या कामामुळं या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलं असून आणखी किती वाहनचालकांना या अपघातांना सामोरं जावं लागणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- नालासोपाऱ्यातील तरुणाने घडवली फुटपाथवर जगणाऱ्या दोघां चिमुरड्यांना हॅलिकॉप्टर स्वारी
- मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांसाठीच्या गृह योजनेत 1844 कोटींचा भ्रष्टाचार, भाजपचा आरोप
- Kalyan : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; सात वर्षानंतर वाचा फुटली, आरोपीवर गुन्हा दाखल
- ऑन ड्युटी पोलिसांवर चाकू हल्ला, एक पोलिस गंभीर, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना