Jiah Khan Case Sooraj Pancholi: बॉलीवूड अभिनेत्री जिया खान स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यात अपयशी ठरली. त्यासाठी तिचा प्रियकर सूरज पांचोलीला जबाबदार ठरवता येणार नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून जियाच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीची मुंबई सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. एखाद्या मुलीनं आत्महत्या करणं हे दुदैवीच आहे, मात्र त्यावेळी जिया ही तिच्या भावनांना बळी पडली होता. ती तिच्या नातेसंबंधात अकडून न राहता त्यातून बाहेर पडू शकली असती, पण तसं झालं नाही. तसेच आरोपीविरोधातील पुरावे हे संदिग्ध आणि साधारण स्वरूपाचे आहेत. जियाला आत्महत्या करण्यास सूरजने भाग पाडलं हे सिद्ध करणारा एकही ठोस पुरावा तपासयंत्रणा अथवा तक्रारदार सादर करू शकले नाहीत, असं सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी आपल्या 51 पानी आदेशात म्हटलेलं आहे.


जियाचं मृत्यूपत्र विश्वासार्ह नाही: कोर्ट


जिया खानने 3 जून 2013 रोजी जूहू येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. जियानं अभिनेता सूरज पांचोलीसोबतच्या तिच्या नात्याचे वर्णन करणारं 6 पानांचे मृत्यूपत्र लिहिल्याचा दावा तिच्या आईनं केला होता. मात्र न्यायालयानं या कथित पत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिया आणि सूरजच्या बिघडलेल्या नात्यांबद्दल याआधी तिनं कोणाकडेही तक्रार केलेली नव्हती. जियाच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी राबियाला तिच्या स्वत:च्या दैनंदिनीत हे कथित पत्र अचानक सापडलं होतं. तसेच हे पत्र पोलिसांनी चौकशीसाठी मागितलं तेव्हा राबियानं ते त्यांना देण्यास नकार देत ते थेट माध्यमांमध्ये जाऊन प्रकाशित केलं. त्यामुळे पत्राबाबत गंभीर संशय निर्माण होतो असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.


सूरजने जियाला नैराश्यातून बाहेर येण्यास मदतच केली: कोर्ट


सूरज पांचोलीनं जियाला नैराश्यातून बाहेर येण्यास मदतच केली होती. परंतु दुर्दैवानं जियानं हे पाऊल उचललं तेव्हा तो कामात व्यस्त होता, त्यामुळे तो जियाला पुरेसा वेळ देऊ शकला नाही, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलंय. साल 2008 मध्येही जिया तणावात होती आणि त्यावर उपचार घेत होती. याआधीही जियाने आत्महत्या करण्याच प्रयत्न केला होता. त्यावेळी सूरजनेच डॉक्टरांना बोलवून तिला नैराश्यातून बाहरे काढलं होतं, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलेलं आहे.


जियाची आई राबियाच्या वागणुकीवरही शंका: कोर्ट


जियाची आई आणि मूळ तक्रारदार राबियाच्या परस्परविरोधी विधानांवर शंका उपस्थित केली. त्यांनी प्रकरण आत्महत्येचे असतानाही हत्या असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी काही पुरावेही सादर केले. तज्ज्ञांनी जियाच्या मृत्यूचे कारण आत्महत्या सांगितले होते. मात्र राबिया यांनी परस्परविरोधी केलेल्या तक्रारीमुळे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांवरही संशय निर्माण झाला होता. राबिया यांनी स्वतः व्यतिरिक्त सर्वांवरच शंका उपस्थित केल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. राबियाच्या म्हणण्यानुसार जिया एक आनंदी मुलगी होती. ती तिच्या बॉलीवूड कारकिर्दीबद्दल आनंदी होती, त्यामुळे ती कधीही आत्महत्या करू शकत नाही. तर जियाला बऱ्याच काळापासून मोठा बॅनरचा चित्रपट मिळालेला नव्हता. ती चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिकेसाठी झगडत होती. ती केलेल्या कामाबद्दल आनंदी नव्हती, असं जियासोबत चित्रपटात काम करणाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये सांगितलं होतं. याशिवाय जियाच्या मृत्यूनंतर लगेचच राबियाने तिच्या दुसऱ्या मुलीचं मुंबईत लग्न पार पाडलं होतं. अशा दुःखाच्या परिस्थितीत देखील असा सोहळा साजरा करणं ही वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीसारखी दिसत नाही, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात अधोरेखित केलेलं आहे.


काय होतं प्रकरण 


जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी घटनेच्या काही दिवसांनी सूरज पांचोलीला अटक केली होती. 1 जुलै 2013 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं सूरजची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर जियाची आई राबिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. आपल्या मुलीचा मृत्यू आत्महत्येनं झाला नसून तिची हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला होता. साल 2014 रोजी हायकोर्टानं हा तपास सीबीआयकडे वर्ग केला. डिसेंबर 2015 मध्ये सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात सूरज पंचोलीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सीबीआयच्या न्यायालयात मार्च 2019 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून 20 एप्रिल 2023 रोजी निकाल राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी सीबीआय न्यायालयाने जाहीर केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: