Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या मृत्यू प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्टानं आपला निकाल जाहीर केला असून या प्रकरणात अभिनेता सूरज पंचोलीची (Sooraj pancholi) निर्दोष मुक्तता झाली आहे.  सूरजनं या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.   या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'सत्याचा नेहमी विजय होतो.' आता सूरजनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'माझा सन्मान आणि आत्मविश्वास मी परत मिळवला आहे', असं म्हणत सूरजनं आपली भावना व्यक्त केली आहे.


काय म्हणाला सूरज?


 सूरज भावना व्यक्त करत म्हणाला, 'हा निकाल 10 वर्षानंतर लागला. हा काळ वेदनादायक होता. अनेक रात्री मला झोप लागली नाही. आज मी केवळ माझ्याविरुद्धचा हा खटला जिंकला नाही तर माझा सन्मान आणि आत्मविश्वासही परत मिळवला आहे. अशा घृणास्पद आरोपांसह जगाला सामोरे जाण्यासाठी खूप धैर्य हवे होते. मी एवढ्या लहान वयात जे अनुभवले ते अनुभवायची वेळ कोणावरही येऊ नये, अशी देवाकडे मी प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील ही 10 वर्षे मला कोण परत देईल हे मला माहीत नाही, पण मला आनंद वाटत आहे की, शेवटी हा निकाल लागला आहे. बरं झालं या गोष्टीचा शेवट झाला आहे,  हे फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या कुटुंबासाठी देखील महत्वाचे होते. या जगात शांततेपेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही.'


3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील  तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. जिया खानच्या घरात सहा पानांची सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये जियानं सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच जियाच्या आईनं देखील सूरजवर गंभीर आरोप केले होते. 






सूरज पांचोलीचे चित्रपट


सूरजनं 2015 मध्ये रिलीज झालेल्या हिरो या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यानं अथिया शेट्टीसोबत स्क्रिन शेअर केली.  टाइम टू डान्स, हवा सिंह या चित्रपटामध्ये देखील सूरजनं काम केलं. गुजारिश, एक था टायगर यांसारख्या चित्रपटांचा सूरज हा असिस्टंट डायरेक्टर होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Jiah Khan: जिया खान मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...