(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण-डोंबिवली मधील पत्री पुलाचा प्रश्न मार्गी लागणार; सर्वात लांब गर्डर उभारण्यासाठी चार दिवस मेगाब्लॉक
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, पत्री पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सर्वात लांब गर्डर उभारण्यासाठी चार दिवस घेण्यात येणार मेगाब्लॉक.
ठाणे : कल्याण-डोंबिवलीकरांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या पत्री पुलाच्या प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या पुलाचे बांधकाम काही महिन्यांपूर्वी सुरु झाले होते. मात्र, त्याला हवी तशी गती प्राप्त झाली नव्हती. आज अखेर मध्य रेल्वेने या पुलाचा गर्डर बसवण्यासाठी मेगाब्लॉक घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे चार दिवसांच्या या मेगाब्लॉक नंतर या पत्री पुलाच्या बांधकामास खऱ्या अर्थाने गती प्राप्त होणार आहे.
कल्याण स्टेशन जवळ असलेल्या पत्रीपूल कमजोर झाल्याने तो पाडण्यात आला होता. त्या जागी नवीन पूल कमीत कमी वेळेत आणि खर्च व्हावा यासाठी एक लोखंडी गर्डर उभारून त्यावर हा ब्रिज तयार करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या 76.67 मीटर लांबीचा गर्डर बनवण्यात आला. हा गर्डर आतापर्यंतचा सर्वात मोठा गर्डर असल्याचे म्हटले जात आहे. हा ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी 4 ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यापैकी 2 ब्लॉक येत्या 21 आणि 22 तारखेला तर पुढील दोन ब्लॉक 28 आणि 29 तारखेला घेण्यात येतील. या चारही मेगाब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणात लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक 1 : शनिवार 21.11.2020 रोजी सकाळी 10.15 ते दुपारी 2.15 पर्यंत
रद्द करण्यात येणाऱ्या लोकल
- डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान सकाळी 9.50 ते दुपारी 2.15 दरम्यान लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
- ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत/कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला/ठाणे/डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
- दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेल्या गाड्या
- 02168 मंडुआडीह-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 01059 लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा विशेष, 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस -दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत.
- कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियमन
02812 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), 01094 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे), 02617 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) आणि 04151 कानपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या वाटेमध्ये १५ ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.
वेळ बदललेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या
01071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष 21.11.2020 रोजी दुपारी 2.00 वाजता सुटेल आणि 01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी विशेष दि. 21.11.2020 रोजी मध्यरात्री 1.00 वाजता सुटेल.
ब्लॉक 2 : रविवार 22.11.2020 रोजी सकाळी 9.50 ते दुपारी 1.50 पर्यंत
रद्द करण्यात आलेल्या लोकल
- डोंबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 9.20 ते दुपारी 1.50 दरम्यान लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
- ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत/कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला/ठाणे/डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेल्या गाड्या
- 03201 पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 02187 जबलपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष, 02168 मंडुआडीह - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 01055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर विशेष, 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष आणि 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा विशेष ह्या गाड्या दिवा - वसई रोड - जळगाव मार्गे वळविण्यात येतील.
- कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियमन
08225 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे), 01094 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे) आणि 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ) 20 मिनिटं ते 105 मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.
वेळ बदललेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या
01071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष दि. 22.11.2020 रोजी दुपारी 1.40 वाजता सुटेल, 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -जबलपूर विशेष दि. 22.11.2020 रोजी दुपारी 2.55 वाजता सुटेल आणि 02586 लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी विशेष दि. 22.11.2020 रोजी दुपारी 2.00 वाजता सुटेल.
खासदार श्रीकांत शिंदे आणि प्रशासनाची बैठक
बहुप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक दरम्यान नागरिकांना प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आज आढावा घेतला. या कामा दरम्यान 250 लोकल रेल्वे सेवा रद्द कराव्या लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी वाहतुकीचे आज झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. यात, नागरिकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे - नवी मुंबई आणि कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अतिरिक्त एस.टी. बसेस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या वतीने तात्पुरता स्वरूपात खाजगी वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.