मुंबई : राज्यातील सध्याची कोरोना रुग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत आहेत. तूर्तास तरी मास्क सक्ती नाही, मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि निर्बंधांबाबत भाष्य केलं.


राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 


मागील काही दिवसांत राज्यात आढळलेले दैनंदिन कोरोना रुग्ण
1 जून - 1081
2 जून - 1045
3 जून - 1134
4 जून - 1357 
5 जून - 1494


'दोन वर्षे शैक्षणिक नुकसानाने एक पिढी बरबाद'
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा सुरु करण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री यांनी मात्र 15 जूनपासून शाळा सुरु होणार असल्याचं स्पष्ट केलं. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "शाळा सुरु करण्याबाबत मात्र आता तरी थांबता येणार नाही. गेली दोन वर्षे शैक्षणिक नुकसानाने एक पिढी बरबाद झाली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत जी परिस्थिती असेल ती बघून निर्णय घेता येईल."


कॅबिनेट बैठकीत कोविड परिस्थितीवर चर्चा पण...
दरम्यान आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीवर चर्चा जरुर होईल, मात्र निर्बंधांबाबतचा विषय सध्या तरी अजेंडावर नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. परंतु नागरिकांनी मास्क घालावेत. ही स्वयंशिस्त लोकांनीच पाळावी, असं आवाहनही त्यांनी केलं.


संबंधित बातम्या


Maharashtra School : राज्यातील शाळा सुरु होण्याचा मुहुर्त ठरला; शिक्षणमंत्र्यांकडून तारीख जाहीर


Maharashtra Corona Update : धोका वाढतोय! रविवारी राज्यात 1494 कोरोना रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण मुंबईत


Corona Mask Must : इंग्रजीमध्ये 'मस्ट' शब्द वापरलेला असला तरी त्याचा अर्थ मास्क बंधनकारक नाही, ते आवाहन : राजेश टोपे