Rajesh Tope On Maharashtra Corona Mask Must : महाराष्ट्रात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्याचं आरोग्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र यावरुन प्रशासन आणि मंत्री यांच्यात मात्र समन्वय नसल्याचं समोर आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोरोना मास्क वापरण्याबद्दल 'मस्ट' शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ 'बंधनकारक' असा नाही, असं म्हणत आरोग्य सचिवांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरोग्य सचिवांचं पत्र आणि आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळं नागरिकांचा मात्र गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आता आरोग्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आरोग्य सचिव कोरोना मास्क संबंधाच्या निर्णयाबाबत सुधारित पत्र काढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


राजेश टोपे यांनी या निर्णयावर बोलताना पुण्यात म्हटलं की,  राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय.  त्यासाठी टास्क फोर्सच्या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले. याचा अर्थ या ठिकाणी मास्कची सक्ती आहे असे नाही. इंग्रजीमध्ये Must शब्द वापरलेला असला तरी त्याचा अर्थ बंधनकारक नाही. ते आवाहन आहे. मीडियाने सक्ती असा त्याचा अर्थ घेऊ नये, असं टोपे यांनी म्हटलं आहे. 


राजेश टोपे म्हणाले की,  मास्क बाबतीत पुढील पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल. रुग्णांची संख्या, त्यांना लागणाऱ्या उपचारांची गरज हे पाहून मास्क सक्ती करायची का हे ठरवलं जाईल. रुग्णसंख्या काही ठिकाणी वाढत असली तरी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्य आहे, असं ते म्हणाले.


राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती, सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन


राज्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात पत्रातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बस, ट्रेन, ऑडिटोरियम, शाळा, ऑफिस, सिनेमा हॉल्स, कॉलेज, हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य सचिव व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांना पत्र लिहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत.