Maharashtra Coronavirus News : राज्यात पुन्हा कोरोनानं (Covid-19) डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे.
बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात पत्रातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बस, ट्रेन, ऑडिटोरियम, शाळा, ऑफिस, सिनेमा हॉल्स, कॉलेज, हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य सचिव व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांना पत्र लिहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात बंदीस्त जागेत जिथं मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात, तिथं मास्क घालणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मात्र मास्क सक्ती लागू केलेली नाही, असं सांगण्यात आलं होतं. नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
मास्कसक्ती की, मास्क वापरण्याचं आवाहन? आरोग्यमंत्री म्हणतात...
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोरोना मास्क वापरण्याबद्दल 'मस्ट' शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ 'बंधनकारक' असा नाही, असं म्हणत आरोग्य सचिवांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरोग्य सचिवांचं पत्र आणि आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळं नागरिकांचा मात्र गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आता आरोग्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आरोग्य सचिव कोरोना मास्क संबंधाच्या निर्णयाबाबत सुधारित पत्र काढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढताना दिसून येत आहे. राज्याच्या राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईतही कोरोनानं हळूहळू डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय ठाणे, पालघर, पुणे, रायगड, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात शुक्रवारी 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 77,37,355 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.06% एवढं झालं आहेत. राज्यात काल तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पाच हजार 127 इतकी झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरीयंटचे बीए4 आणि बीए5 सब-व्हेरीयंटचा वेगानं प्रसार होत असल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona Mask Must : इंग्रजीमध्ये 'मस्ट' शब्द वापरलेला असला तरी त्याचा अर्थ मास्क बंधनकारक नाही, ते आवाहन : राजेश टोपे
- मुंबईकरांना चौथ्या लाटेची भीती? दैनंदिन रुग्णसंख्या 700 पार, 'या' भागात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट
- कोरोना लसीकरण जलद करण्यासाठी BMC ची 'हर घर दस्तक' मोहीम; 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना प्राधान्य