एक्स्प्लोर
मंत्री राजकुमार बडोलेंच्या पीएला 10 लाख दिले: अरुण निटुरे
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएला 10 लाख रुपयांची लाच दिली, असा दावा संस्थाचालक अरुण निटुरे यांनी केला.

उस्मानाबाद: सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएला 10 लाख रुपयांची लाच दिली, याशिवाय त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याल 1 लाख 60 हजार रुपये दिले, तरीही आश्रमशाळेच्या अनुदानाचं काम केलं नाही. त्यामुळे अधिकाऱ्याला दोन चपट्या मारल्या, असं स्पष्टीकरण संस्थाचालक अरुण निटुरे यांनी दिलं. एबीपी माझाने अरुण निटुरे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. मंत्रालयात पैशांचा बाजार सुरु आहे. कोणतीही फाईल पैसे दिल्याशिवाय पुढे सरकत नाही. निटुरे यांच्या सारखे 322 संस्थाचालक आहेत, ज्यांची फाईलचं पैसे दिल्याशिवाय हालतच नाही, हे निटुरेंच्या प्रतिक्रियेतून समोर आली. अरुण निटुरेंची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या केशेगाव इथं 2002 पासून आश्रमशाळा आहे. अरुण निटुरे एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्याची प्रक्रिया करत आहेत. यासाठी ते तीन वर्षांपासून मंत्रालयात चकरा मारत आहेत. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला पैसेही दिल्याचा दावा केला आहे. याच कामासाठी ते शुक्रवारी मंत्रालयात आले. बडोलेंच्या कार्यालयात त्यांनी ‘त्या’ अधिकाऱ्याची भेट घेतली. त्या अधिकाऱ्याला कामाची विचारणा केली. शिवाय कामासाठी पैसे दिले, इतके दिवस वाट पाहिली, पण तरीही काम का होत नाही, असं विचारलं. त्यावर त्या अधिकाऱ्याने मी तुझा एक पैशाचा मिंधा नाही, असं म्हणताच, अरुण निटुरेंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. पैसे घेऊनही मुजोरी करतोस, असं म्हणत अरुण निटुरेंनी मारहाण केली. हा सर्व प्रकार घडला त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे पीएही उपस्थित होते. त्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व प्रकार होऊन गेला होता. दरम्यान एबीपी माझानं अरुण निटुरेंच्या आरोपाची पडताळणी केलेली नाही. त्यामुळे खुद्द मंत्री राजकुमार बडोले यांनीच आपल्या पीएच्या विरोधात तक्रार दाखल करुन सत्य जगासमोर आणलं पाहिजे. VIDEO इथे पाहा अरुण निटुरे काय म्हणाले? मंत्री, पीए आणि पीएच्या खाली अधिकारी गबाले आहेत. त्यांचं काय साटं लोटं असेल माहित नाही. प्रश्न - पीए, मंत्री आणि गबाले यांचं साटेलोटं आहे का? अरुण निटुरेंचं उत्तर - मंत्री यामध्ये नाहीत. पहिल्यापासून नाहीत. प्रश्न - गबालेंनी जे पैसे मागितले ते मंत्री आणि पीएला द्यायचं आहेत असं म्हणूनच मागितलं ना? अरुण निटुरेंचं उत्तर - असं म्हणून त्यांनी घेतलं. त्यावेळी मी नवीन होतो. ते देऊन टाकले. प्रश्न - 1 लाख 60 हजार दिले? उत्तर - हां. प्रश्न - मग पुन्हा फाईलचं काय झालं? उत्तर - फाईल खाली गेली, त्यात त्यांनी आक्षेप घेतले, असं नाही तसं नाही म्हणत फाईल फिरवत बसले. प्रश्न - पैसे दिल्यानंतरही? उत्तर - हो प्रश्न - याचा अर्थ असा होतो, त्यांना आणखी काहीतरी हवं होतं.. त्यांनी आणखी काही मागणी केली नाही का? उत्तर - कसं आहे, डिमांड तर करतच राहतात सतत. पण काय करणार? सांगा ना प्रश्न - मी फार पर्टिक्युलर तुम्हाला विचारतोय, 1 लाख 60 हजार रुपये तुम्ही दिले उत्तर - हो. प्रश्न - तुम्ही 2002 पासून शाळा चालवताय..त्यानंतर दोन सरकारं आली आहेत, तुम्ही मुलांना सांभाळावं असं तुमचं मत आहे. तुम्ही पैसे पण दिले आहेत. उत्तर - यावर्षी लेकरं सोडून दिली. तुम्ही माझी शाळा बघा, मराठवाड्यात अशी शाळा आहे का दाखवा. प्रश्न - तुम्ही राजकीय संघटनेत, सामाजिक संघटनेत काम केलंय हे माहिताय. पण हे सांगा मंत्र्याच्या पीएने किती पैसे मागितले? उत्तर - माझीच नाही सगळ्यांची फाईल गेलीय प्रश्न - 322 जण आहात, सगळ्यांना किती पैसे द्यावे लागले? उत्तर - त्यांचं माहित नाही. लोकांच्या भानगडीत पडलो नाही. प्रश्न - तुम्ही 1 लाख 60 हजार दिले, मग पीएने किती मागितले हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला वैयक्तिक किती मागितले? प्रश्न मिटला का तुमचा? फाईल पुढे का जात नाही? पीएने किती मागितले? उत्तर - मला सांगा त्यांनी पर शाळा 10 लाख रुपये.. मग आपण कुठून द्यायचं? प्रश्न - हे मंत्र्यांनी मागितलं की पीएने? उत्तर - मंत्री नाही. मंत्र्याला कळू देत नाहीत. प्रश्न - 10 लाख कुणी मागितले? उत्तर - माने साहेब! अनेक वर्षांपासून चकरा दरम्यान, अरुण निटुरे यांनी या कामासाठी आपण अनेक वर्षांसाठी चकरा मारत असल्याचं सांगितलं. या चकरांमध्येच बराच पैसा खर्च झाल्याचं ते म्हणाले. 'आधीच्या सरकाने फुकट मान्यता दिली' यावेळी अरुण निटुरेंना विचारण्यात आलं की नवं सरकार आलेल्या भाजप सरकारमध्येही आणि पूर्वीच्या सरकारमध्ये, दोन्ही ठिकाणी पैसे द्यावे लागतात की फरक आहे? त्यावर निटुरे म्हणाले, "पहिल्या सरकारने सर्व मान्यता फुकट दिल्या, कोणताही पैसा घेतला नाही. आताच्या सरकारमधील मंत्र्यांनी पैसे घेतले नाही. मी रोज मंत्र्यांना भेटतो, पाया पडतो. पण महाराष्ट्रात कुणाचीही फाईल निघालेली नाही. एकही फाईल फुकट निघत नाही." अरुण निटुरे यांचे आरोप मुख्यमंत्र्यांनी नोटिंग टाकूनही तीन वर्षापासून फाईल पुढे सरकली नाही. मंत्र्यांनी वारंवार सांगूनही पीए, गबाले फाईल पुढे सरकवत नव्हते. गबाले नावाच्या कर्मचार्याला 1 लाख 60 हजार दिले बडोले यांच्या पीएला 10 लाख दिले. मंत्रालयातली कोणतीच फाईल पैसे दिल्याशिवाय पुढे सरकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडले तर बाकीच्या सगळ्या विभागात भ्रष्टाचार सुरु आहे. वेगवेगळी कारणं सांगून पैशाची मागणी केली जाते. 322 संस्थाचालकांकडून वेगवेगळे पैसे घेतले गेलेत. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले गप्प का? अरुण निटुरे यांच्या आरोपानंतर एबीपी माझाने सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बडोले अद्याप समोर आलेले नाहीत. त्यांच्याकडून याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आणखी वाचा























