मुंबई : बँक घोटाळ्याचे आरोप असलेल्या वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती राज्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. सोशल मीडियावर लाईव्ह येत गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. यासोबत वाधवान कुटुंबीय लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वर येथे गाड्यांचा ताफा घेऊन गेल्याने चर्चेत आले होते, यावरही अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली.
देशात लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाधवान कुटुंबियांना परवानगीचं पत्र दिल्याचं विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी कबूल केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून या चौकशीचा अहवाल लवकरच समोर आणला जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. मात्र मधल्या काळामध्ये या पत्रावरुन मोठं राजकारण करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. अशा परिस्थितीत असं राजकारण करणे दुर्दैवी होतं, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अशा पद्धतीचं राजकरण न करण्याचं आवाहन केलं होतं. कोरोनाच्या लढाईत सर्वांनी एकत्र यावं असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर राजकारण सुरु राहिलं. छोटे नेते नाहीतर महाराष्ट्राचं नेतृत्व केलेल्या अशा मोठ्या नेत्यांनीही या राजकारणात सहभाग घेतला. सध्याच्या संकटाच्या काळात सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. सर्व एकत्र येऊन आपण ही लढाई जिंकलोच पाहिजे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाचा महाबळेश्वरपर्यंत प्रवास
बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधू कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हतं. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने अख्ख्या कुटुंबाला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.
कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत.
कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं : देवेंद्र फडणवीस
स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात
वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर
लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र मिळालं. यानंतर वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
'त्या' 23 जणांमध्ये कुणाचा समावेश?
कपिल वाधवान
अरुणा वाधवान
वनिता वाधवान
टीना वाधवान
धीरज वाधवान
कार्तिक वाधवान
पूजा वाधवान
युविका वाधवान
अहान वाधवान
शत्रुघ्न घागा
मनोज यादव
विनीद शुक्ला
अशोक वाफेळकर
दिवाण सिंग
अमोल मंडल
लोहित फर्नांडिस
जसप्रीत सिंह अरी
जस्टीन ड्मेलो
इंद्रकांत चौधरी
प्रदीप कांबळे
एलिझाबेथ अय्यापिल्लई
रमेश शर्मा
तारकर सरकार