मुंबई : पोलीसांच्या ट्रॅफिक चौक्यांबाहेर जुन्या मोडकळीस आलेल्या गाड्यांचा खच लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण वर्षानुवर्ष तिथेच पडून असलेली ही वाहनं आता पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर हलवण्याचा विचार असल्याचं पोलिसांनी हायकोर्टाला कळवलं आहे. सध्या बेकायदेशीर पार्किंगवर कारवाईसाठी लागणाऱ्या टोईंग व्हॅन पार्क करण्यासाठीच मुंबई पोलीसांच्या ट्रॅफिक विभागाकडे जागा उपलब्ध नसल्याची कबूली राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे.


दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयानं वेळोवेळी ट्रॅफिक पोलिस विभागाला चांगलंच फैलावर घेतलं आहे. वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी ट्रॅफिक विभागातील भ्रष्टाचाराविरोधात दाखल केलेली जनहित याचिका न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं सोमवारी निकाली काढली. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाहतूक पोलिस विभागानं गेल्या दोन वर्षात संपूर्ण वाहतुक विभागत केलेल्या सुधारणांची माहिती हायकोर्टात सादर केली.

मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी चढाओढ, अनेक अधिकाऱ्यांची 'फिल्डिंग!

पार्किंगच्या वाढत्या समस्येबाबत विशेष मोहिम - 

मुंबईतील पार्किंगच्या वाढत्या समस्येबाबत मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक विभागाची विशेष मोहिम सुरू आहे. प्रत्येक ट्रॅफिक चौकीला दरमहिन्याला त्यांच्या विभागातील वाहतूक कोंडीला जबाबदार असणाऱ्या किमान दोन जागांवर कारवाई करणं बंधनकार करण्यात आलं आहे. मुंबईत मरिन ड्राईव्ह, सीएसएमटी, दादर, कुर्ला, बोरीवली अश्या ठिकाणी विशेष कारवाई मोहिम राबवण्यात आल्या. मुंबईत सध्या 5408 सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्या विरोधात ऑक्टोबर 2016 पासून आत्तापर्यंत तब्बल 9,20,000 ई चलान काढण्यात आले असून 9,20,668 रूपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर जानेवारी 2017 पासून वांद्रे-वरळी सी लिंक, ईस्टर्न फ्री वे आणि मरिन ड्राईव्हवर बसवलेल्या 32 स्पीडगन कॅमेऱ्यांद्वारे वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आजवर 9,30,390 ई चालन पाठवण्यात आले आहेत. लवकरच 100 ट्रॅफिक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्यात येणार असून त्यांद्वारे कायदा मोडणाऱ्या बेशिस्त चालकांसह पोलीसांच्या वर्तनावरही लक्ष ठेवता येईल, अशी माहिती मुंबई पोलीसांच्या वाहतूक शाखेचे सहआयुक्त अमितेष कुमार यांनी प्रतिज्ञापत्रावर हायकोर्टात सादर केली आहे.

सिग्नलवर सतत हॉर्न वाजवणाऱ्यांना मुंबई पोलिसांचा दणका, पोलिसांच्या भन्नाट आयडियाचं कौतुक

कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीसांवरही कारवाई होणार -

सार्वजनीक रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या बसेस, ट्रक, डंपर यांविरोधातही विषेश मोहिम राबवण्यात आली असून अनेक निवासी भागांत रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्यांना सोसायटींनाही सार्वजनिक वाहनतळांवर पार्किंग करण्यासाठी उद्युक्त केलं जात असल्याची माहिती देण्यात आली. पोलीसांना नेमून दिलेल्या जागी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीसांवरही कारवाई होत असल्याचं यात स्पष्ट केलं आहे. जर नागरिकांच्या ट्रॅफिक पोलीसांविरोधात काही तक्रारी असतील तर complaint.mumtraffic@mahapolice.gov.in वर तक्रार करण्याचं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलंय. या तक्रारींचा 72 तासांत चौकशी पूर्ण करून केलेल्या कारवाईची तक्रारदाराला माहिती देणं वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्याला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मुंबई पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीसांकडे 35 वाहतूक कॉन्स्टेबलांनी लोकांकडून लाच स्वीकारल्याची प्रकरणं आली होती, त्यातील 13 जणांची बदली करण्यात आली असून दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे.

Mumbai | मुंबई पोलीस आयुक्तपदी कोण? आयुक्तपदासाठी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच | ABP Majha