मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लावण्यासाठी आता आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. संजय बर्वे हे मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त आहेत. फेब्रुवारीअखेरीस ते सेवानिवृत्त होत आहेत. बर्वे यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी हेमंत नगराळे, के. व्यंकेटशम हे सेवाज्येष्ठतेनुसार शर्यतीत आहेत. तर परमबीर सिंह, सदानंद दाते, रश्मी शुक्ल यांची नावंही चर्चेत आहेत. त्यामुळे आता राज्यातील महत्त्वाच्या म्हणजेच मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागू शकते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तीन-तीन महिने असा एकूण सहा महिन्यांचा कार्यकाळ वाढवून मिळाल्यानंतर ते फेब्रुवारी अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर नियुक्त होण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी 'फिल्डिंग' लावली आहे. या पदावर विराजमान होण्यासाठी ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांच्या सहमतीनंतर मुंबईचा पोलीस आयुक्त कोण होणार हे ठरणार आहे. त्यामुळे शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे कोणत्या अधिकाऱ्यावर एकमत होते, हे पाहणं पाहावं लागेल.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले, तरी प्रशासकीय निर्णय आणि राजकीय धोरण हे शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार ठरत आहेत. कारभार सुकर करण्यासाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सल्ला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं रिमोट कंट्रोल असलेल्या शरद पवारांनी दिला होता. पवारांच्या त्या सल्ल्याची आता अंमलबजावणी होताना दिसत आहे.
Web Explainer | आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं राजकारण | ABP MAJHA