सिग्नलवर सतत हॉर्न वाजवणाऱ्यांना मुंबई पोलिसांचा दणका, पोलिसांच्या भन्नाट आयडियाचं कौतुक
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2020 06:10 PM (IST)
मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंत्रणा लावली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. यामध्ये सिग्नल परिसरात असणाऱ्या दुभाजकावर असणारी यंत्रणा हॉर्नच्या आवाजाची तीव्रता मोजणार डेसीबल मीटर बसवण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईत सिग्नल लागल्यानंतर 60 सेकंद थांबण्याचं संयम मुंबईकरांमध्ये नसतं. सिग्नल 10 सेकंदापर्यंत आला की, लगेच हॉर्न वाजवून सुटण्याची घाई मुंबईकरांना असते. आता यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक भन्नाट आयडिया काढली आहे. यामुळे सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणं थांबेल, अशी अपेक्षा मुंबई पोलिसांना आहे. मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज मोजणारी यंत्रणा लावली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. यामध्ये सिग्नल परिसरात असणाऱ्या दुभाजकावर असणारी यंत्रणा हॉर्नच्या आवाजाची तीव्रता मोजणार डेसीबल मीटर बसवण्यात येणार आहे. वाहन चालकांकडून वाजवण्यात येणाऱ्या हॉर्नची तीव्रता 85 डेसिबलपेक्षा जास्त झाली. तर सिग्नल रिसेट होतो. त्यामुळे वाहन चालकांना जास्त वेळ सिग्नलवर जास्त वेळ थांबावं लागणार आहे . सिग्नलवर मोठमोठ्यानं हॉर्न वाजवण्यापेक्षा संयम ठेवून सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहणं, हे वाहन चालकांना शिकवण्यासाठी पोलिसांनी हा प्रयोग केला आहे. मोठमोठ्यानं हॉर्न वाजवल्यास सिग्नल लवकर हिरवा होता, असं काहींना वाटतं. त्यामुळे ही मंडळी लाल सिग्नल दिसताच जोरजोरात हॉर्न वाजवतात. मात्र आता त्याचा नेमका उलट परिणाम सिग्नलवर दिसेल, असं मुंबई पोलिसांनी व्हिडीओतून म्हटलं आहे. आवाजाची तीव्रता मोजून सिग्नल रिसेट करणाऱ्या या यंत्रणेला पोलिसांनी 'शिक्षा देणारा सिग्नल' असं नाव दिलं आहे