मुंबई : भारतीय रेल्वेवर सुरु झालेल्या विद्युत गाड्यांच्या नव्या युगाला आज 95 वर्षे पूर्ण झाली. 3 फेब्रुवारी 1925 ला पहिली विजेवर धावणारी लोकल तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत चालवण्यात आली होती. आजच्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन मध्य रेल्वेने खास 1500 व्होल्ट विजेवर धावणारी लोकल आज चालवली. मध्य रेल्वेचे उप महाव्यवस्थापक सुशील वावरे यांनी हिरवा झेंडा दाखवून ही लोकल सीएसएमटी स्थानकातून सोडण्यात आली.


3 फेब्रुवारी 1925 रोजी केवळ चार डबे घेऊन ही लोकल धावली होती. तिचा वेग काशी 50 मैल इतका होता. डबे हे लाकडी बनावटीचे होते. त्यात मध्ये लोखंडाचा देखील वापर करण्यात आला होता. मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती. तेव्हाच्या वृत्तपत्रात भारतात एका प्रदूषणरहित नवीन युगाची सुरुवात, अशा मथळ्याखाली बातम्या छापून आल्या होत्या.


विजेवर धावणाऱ्या लोकलचा प्रवास
1925 - पहिली चार डब्यांची विजेवर चालणारी लोकल हार्बर रेल्वेवर धावली
1927 - पहिली आठ डब्यांची विजेवर चालणारी लोकल मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर धावली
1928 - पश्चिम रेल्वेवर पहिली विजेवर चालणारी लोकल धावली
1961- पहिली नऊ डब्यांची लोकल मध्य रेल्वेवर धावली
1986 - पहिली बारा डब्यांची लोकल मध्य रेल्वेवर धावली


या जुन्या डीसी लोकल चालवणाऱ्या विणा धरण या कर्मचाऱ्याला देखील आज बोलवण्यात आले होते. त्यांनी देखील त्या काळाचे आपले अनुभव सांगितले.


फेब्रुवारी 1925 नंतर अनेक नवनवे तंत्रज्ञान घेऊन लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावू लागल्या. इतकेच नाही तर विजेवर चालणारे इंजिन देखील बनवले गेले आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या विजेवर धावू लागल्या. त्यामुळे कोळसा आणि डिझेल जाळून होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत झाली. आता भारतीय रेल्वे ही पूर्णतः विद्युतीकरण आकडे वाटचाल करते आहे. अशावेळी आजचा दिवस साजरा करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.