मुंबई : शरद पवार, अजित पवार यांच्यावर सातत्याने बेधडक टीका करणारे डॉ. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी आता राज ठाकरेंविरोधात (Raj Thackeray) आघाडी उघडली आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरेंविरोधात शिवााजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) तक्रार दाखल केली आहे. मुलुंड येथील टोल नाका (Mulund Toll Plaza) जाळपोळ प्रकरणात राज ठाकरे मास्टरमाईंड असून त्यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
कष्टकरी जनसंघाच्यावतीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी म्हटले की, महाराष्ट्रात मराठी गुजराती आणि उत्तर प्रदेशातील लोक मिळून राहतात. महाराष्ट्र हा कोण्या एकट्याचा नसल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी बसून काही वक्तव्य केले. ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील टोलमध्ये झोल झाला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मनसेचा कार्यकर्त्याने मुलुंडमधील टोल नाका जाळला. या सर्व घटनेसाठी राज ठाकरे हे मास्टरमाईंड आहेत. त्यामुळे जाळपोळीसाठी ते जबाबदार आहेत. म्हणूनच आम्ही या संदर्भात तक्रार करण्यासाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आलो असल्याचे डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
सीआरपीसी 154 अनुसार राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार घेण्याची मागणी शिवाजी पार्क पोलिसांना केली आहे. पोलिसांनी आम्हाला या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सदावर्तेंनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये टोल संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होते. आणि मनसैनिकाने पनवेल, वाशी व मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन ही केलं. काही चार चाकी वाहनांना मनसे कार्यकर्त्यांनी टोल न भरता सोडलं होत. मात्र या सर्व प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाले.
मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक, टोल नाक्याप्रकरणी मनसैनिकांवर पोलिसांची कारवाई
मुलुंड टोल नाक्यावर (TollNaka) करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पोलिसांनी अटक केली. राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर अविनाश जाधव आणि इतर मनसैनिकांनी टोल नाक्यावर जात चार चाकी वाहनांना टोल न भरता जाऊ दिले. त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांना हटवले. सायंकाळच्या सुमारास एका मनसैनिकाने मुलुंडचा टोलनाका पेटवला.