सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलबाबत (Toll) घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. टोल नाक्यांना आगी लावून टाकू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनतर मुंबईतील मुलुंड टोल नाक्याला एका मनसैनिकाकडून आग लावण्यात आली. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्ष खरात गटाचे प्रमुख सचिन खरात (Sachin Kharat) यांनी ही मागणी केली आहे. 


आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी म्हटले की, टोलच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी तोडफोडीची भाषा वापरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर राज्य आणि देश चालतो. त्यामुळे राज ठाकरेंची तोडफोडीची भाषा ही असंवैधानिक आहे. राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही करत आहोत, असे त्यांनी म्हटले. 


मुलुंड टोल नाका पेटवला 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलबाबतच्या (Toll) इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी (MNS supporters) पहिला टोलनाका पेटवून दिलाय. मुलुंड टोलनाका मानसैनिकांनी पेटवला. टोलनाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवून दिला.


राज ठाकरे काय म्हणाले होते ? 


महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी "देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू"