मुंबई : टोलनाक्यावर (TollNaka) करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेचे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यभरात सध्या टोलनाक्या मुद्द्यावर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी राज्यभर टोलनाक्यांवर आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोमवार (9 ऑक्टोबर) रोजी पत्रकार परिषद घेत टोलनाक्याच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मनसैनिक देखील आक्रमक होऊ लागले. मनसैनिकांनी टोल नाक्यावर टोल नाक्यावर उभं राहत चार चाकी वाहनं अशीच सोडली. त्यानंतर या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड केली. वाशी आणि दहिसर टोलनाक्यावरुन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अटक केल्यानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया
'मला अटक करण्यात आली आहे. मला मेडिकलला घेऊन जात आहेत. माझ्यासह 12 जणांना अटक केलीये. आमची धरपकड करण्यापेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी जे म्हटलय, त्याचे जर पालन झाले तर धरपकड करण्याची गरज नाही', अशी अविनाश जाधव यांनी अटकेनंतर प्रतिक्रिया दिली.
मनसैनिकांनी पहिला टोलनाक पेटवला
टोलनाक्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाल्याचं चित्र सध्या आहे. त्यातच मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका पेटवला.टोल नाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा टोलनाका पेटवला. तर या प्रकरणात एक मनसैनिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुंबईसह राज्यभरात मनसैनिक आक्रमक
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईसह राज्यभरातील मनसैनिक आक्रमक झाले. मनसैनिकांनी जुन्या मु्ंबई-पुणे हायवेवर (Mumbai - Pune highway) असलेल्या शेडूंग टोल नाका (Shedung Toll) येथे आंदोलन सुरु केलं. मनसेने शेडूंग टोल नाका येथून जाणाऱ्या वाहनांना विनाटोल सोडण्याची मागणी केली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडले.
राज ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी "देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू"
हेही वाचा :
MNS Protest On Toll : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, पहिला टोलनाका पेटवला!