New Financial Year : आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-2023 सुरु झाले आहे. या नवीन आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींनुसार 1 एप्रिलपासून ग्राहकांवर महागाईचा बोझा अधिक वाढणार आहे. टीव्ही, फ्रिज, एसी यासह मोबाईल घेणं महागणार असून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्कामध्ये बदल केले होते. त्यामुळं एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या आयात शुल्कामुळं काही वस्तू महागणार आहेत. तसेच ज्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात आले आहे, ती उत्पादने देखील महागणार आहेत. तर दुसरीकडे एक दिलासा देणारी देकील बातमी आहे. ती म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किंमती 6 रुपये प्रती किलोने घसरल्या आहेत. त्यामुळं वाहनधारकांना आता 1 एप्रिलपासून 60 रुपये प्रतिकिलो दरानं गॅस भरता येणार आहे. याआधी तो दर 66 रुपये प्रती किलो होता.


सीएनजीवरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर संपूर्ण राज्यात सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे. वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यात 1 एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार असून, त्याचा फायदा ऑटो-रिक्षा, टॅक्सी चालक, प्रवासी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे.


सरकारने 1 एप्रिलपासून ॲल्युमिनियमवर 30 टक्के आयात शुल्क लावले आहे. याचा वापर टीव्ही, एसी आणि फ्रिजचे हार्डवेअर बनवण्यासाठी होतो. कच्च्या मालाचा पुरवठा महागल्यानं कंपन्या उत्पादनाचे दर वाढणार आणि त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. याशिवाय कॉम्प्रेसरमध्ये वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. ज्यामुळं फ्रिज घेणे महागणार आहे. सरकारनं एलईडी बल्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर मूळ सीमा शुल्कासह 6 टक्के प्रतिपूर्ती शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आजपासून हा नवा नियम लागू झाल्यानंतर एलईडी बल्ब महाग होतील.


चांदी महागणार


सरकारने चांदीवर आयात शुल्कात बदल केला आहे, ज्यामुळे चांदीची भांडी, वस्तू महाग होतील. याशिवाय स्टीलचे दरही वाढले आहेत, त्यामुळे स्टीलची भांडीही महागण्याची शक्यता आहे. मोबाईलमधील प्रिंटेड सर्किट बोर्डवर सरकारने सीमा शुल्क लागू केले आहे. त्यामुळे याची आयात महागणार असून कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल. त्यामुळे ग्राहकांनाही मोबाईल खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागतील. वायरलेस ईयरबड तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही उपकरणांवरील आयात शुल्क वाढवले आहे. ज्यामुळे हेडफोनचा उत्पादन खर्च वाढणार असून कंपन्या आपल्या उत्पादनांचे दर वाढवतील.


महत्त्वाच्या बातम्या: