मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून राजधानी मुंबईतही (Mumbai) गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे चारही धरणं ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस (Rain) पडल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असून तालुक्यातील चारही धरणं (Dam) ओव्हर फ्लो झाली आहेत. सर्वात आगोदर तानसा धरण ओव्हर फ्लो झाले होते, त्या पाठोपाठ मोडकसागर धरण व काल संध्याकाळी भातसा धरणही ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. विशेष म्हणजे रात्री अडीच वाजता मध्य वैतरणा धरण देखील ओसांडून वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 


मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असून सध्या पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने या चारही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच, नदी काठी असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, उपनगरांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहापूर तालुक्यात देखील रात्रीपासूनच दमदार पाऊस सुरू असल्याने भातसा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या, भातसा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. शहापूर - शेणवा-कीन्हवली-मुरबाड या मार्गावर असलेल्या सपगाव जवळील भातसा नदीवरील पुलाला पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर पुलावरून पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, भातसा नदीकाठी असलेल्या सापगावसह अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी 5 तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती. जुलै महिन्यात अनेक दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पवई तलाव भरला होता. त्यानंतर आता तुळशी तलाव भरल्यानंतर आता सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा 


Pune Heavy Rain: पुण्यात पुन्हा पूरस्थिती; खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजित पवारांच्या सूचना